मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या ५५ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा एमए चिदंबरम स्टेडियमवर २७ धावांनी पराभव केला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने २० षटकांत आठ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ २० षटकांत ८ गडी गमावून १४० धावाच करू शकला.
१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली आणि दुसऱ्या चेंडूवर कर्णधार डेव्हिड वॉर्नर खाते न उघडता बाद झाला. त्याचवेळी फिल सॉल्टही १७ धावा करून दीपक चहरचा दुसरा बळी ठरला. मनीष पांडेच्या समन्वयातील त्रुटीमुळे मिचेल मार्श अवघ्या ५ धावा करून धावबाद झाला. रिले रोसोव आणि मनीष पांडे यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, पण पाथीरानाने मनीषला २७ धावांवर बाद केले.
३५ धावा करून रवींद्र जडेजाने रोसोवलाही बाद केले. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने १२ चेंडूत २१ धावा काढल्या, पण त्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशा ठरल्या नाहीत. सीएसकेच्या गोलंदाजांसमोर दिल्लीचा फलंदाजीचा क्रम पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि संघ ८ गडी गमावून केवळ १४० धावाच करू शकला. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर संघाच्या कामगिरीवर नाराज दिसला आणि त्याने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही आणि डेव्हन कॉनवे केवळ १० धावा करू शकला. ऋतुराज गायकवाडही काही चांगल्या फटक्यांनंतर २४ धावा काढून अक्षर पटेलचा बळी ठरला. अजिंक्य रहाणेही काही खास करू शकला नाही आणि २१ धावा करून बाद झाला. मोईन अलीने १२ चेंडूंचा सामना केल्यानंतर अवघ्या ७ धावा केल्या. शिवम दुबेने १२ चेंडूत २५ धावा फटकावल्या, पण त्याला त्याच्या खेळीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. आपला २०० वा आयपीएल सामना खेळणारा अंबाती रायडू २३ धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने १६ चेंडूत २१ धावा केल्या, तर एमएस धोनीने अवघ्या ९ चेंडूत २० धावा केल्या, त्यामुळे चेन्नईचा संघ २० षटकात ८ गडी गमावून १६७ धावा करू शकला.
४१ वर्षीय माही मैदानात येताच वातावरण बदलले. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने दिल्लीविरुद्ध दोन षटकार मारून सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. धोनीच्या या षटकारांवर केवळ प्रेक्षकच खुश झाले नाहीत तर प्रेक्षकदीर्घेत बसलेल्या त्याच्या कुटुंबीयांनीही जल्लोष केला. मुलगी जीवाने शिट्टी वाजवून त्याला प्रोत्साहन दिले. त्याचवेळी पत्नी साक्षी धोनीने टाळ्या वाजवल्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जला ८ विकेट्सवर १६७ धावांत रोखले. मिचेल मार्शने ३ षटकात १८ धावा देत ३ बळी घेतले. अक्षर पटेलने २ बळी घेतले. कुलदीप यादव, ललित यादव आणि खलिल अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
त्याचवेळी चेन्नईकडून माथिशा पाथीराणा ४ षटकात ३७ धावांत ३ बळी, दीपक चहरने ३ षटकात २८ धावांत २ बळी तर रवींद्र जडेजाने ४ षटकात १९ धावांत एक गडी बाद केले.
चेन्नई गुणतक्त्याध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. ७ सामने जिंकले आहेत आणि चारमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णीत झाला होता. चेन्नईचे १५ गुण आहेत. तर, दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने ११ पैकी चार सामने जिंकले असून ७ सामने गमावले आहेत. त्याला ८ गुण आहेत.
रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४