मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३ च्या ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ३४ धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. १३ सामन्यांनंतर गुजरातचे १८ गुण आहेत. हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या पराभवासह हैदराबादसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने नऊ गड्यांच्या मोबदल्यात १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ नऊ गडी गमावून केवळ १५४ धावा करू शकला आणि सामना गमावला.
गुजरातकडून शुभमन गिलने १०१ धावा केल्या. साई सुदर्शनने ४७ धावांची खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने पाच बळी घेतले. मार्को जॅनसेन, फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. हैदराबादकडून क्लासेनने ६४ आणि भुवनेश्वर कुमारने २७ धावा केल्या. त्याचवेळी गुजरातकडून शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी चार विकेट घेतल्या.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गुजरातला फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वृध्दिमान साहाला भुवनेश्वर कुमारने बाद केले, पण त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने जबाबदारी स्वीकारली. मात्र, या काळात सुदर्शनला धावबाद करण्याची संधी गमावणे हैदराबादला महागात पडले. चौथ्या षटकात गिलने फजलहक फारुकीला सलग चार चौकार ठोकले. पॉवरप्लेमध्ये गुजरातची धावसंख्या एका विकेटवर ६५ धावा होती. पुढच्याच षटकात गिलने २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यात त्याने नऊ चौकार मारले.
गिल आणि सुदर्शन यांनी अत्यंत वेगवान फलंदाजी केली. १०व्या षटकातच दोघांनी गुजरातची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. दोघांनी ५७ चेंडूत शतकी भागीदारी पूर्ण केली. गिलप्रमाणेच सुदर्शनही अर्धशतकाच्या जवळ येत होता, पण जॅनसेनच्या १५व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारण्याच्या ओघात तो नटराजनकडे झेलबाद झाला. त्याने ३६ चेंडूत ४७ धावा केल्या. शुभमन आणि सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली.
सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. २८ धावांच्या अंतरात गुजरातने हार्दिक (८), मिलर (७), राहुल तेवतिया (३) यांचे विकेटही गमावले. त्यानंतर गिलने १९व्या षटकात ५६ चेंडूत आयपीएलचे पहिले शतक पूर्ण केले, ज्यात त्याने १३ चौकार आणि एक षटकार लगावला. शतक पूर्ण करताच तो ५८ चेंडूत १०१ धावा करून बाद झाला. गुजरातने शेवटच्या सहा षटकात फक्त ४१ धावा केल्या आणि आठ विकेट गमावल्या. गुजरातसाठी गिल आणि सुदर्शन यांच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकड्याला स्पर्श करू शकला नाही. या संघाच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.
भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या षटकात चार विकेट पडल्या. यापैकी तीन भुवीच्या नावावर तर एक धावबाद झाला. भुवनेश्वरने आयपीएल कारकिर्दीत दुसऱ्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. हैदराबादच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे १५ षटकांत दोन गडी गमावून १५४ धावा करणाऱ्या गुजरात संघाला २० षटकांत नऊ गडी गमावून १८८ धावाच करता आल्या. भुवनेश्वरशिवाय हैदराबादकडून मार्को जॅनसेन, फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. गुजरातच्या शेवटच्या आठ विकेट ४१ धावांत पडल्या.
१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवातही खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात अनमोलप्रीत सिंग पाच धावा काढून शमीचा बळी ठरला. पुढच्याच षटकात यश दयालने अभिषेक शर्माला साहाकरवी झेलबाद केले. यानंतर शमीने राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करामला बाद करत हैदराबादची धावसंख्या २९/४ अशी केली. पॉवरप्लेमध्ये हैदराबाद संघाला केवळ ४५ धावाच करता आल्या. यानंतर सनवीर सिंग मोहित शर्माचा बळी ठरला. अब्दुल समदलाही मोहितने बाद केले. ४९ धावांत सहा विकेट्स गमावल्यानंतर हैदराबादचा पराभव निश्चित झाला. हेन्रिक क्लासेनने एक टोक धरले असले तरी दुसऱ्या टोकाला फलंदाज बाद होत होते. समदनंतर मार्को जॅनसेनही तीन धावा करून बाद झाला. ५९ धावांत सात विकेट पडल्यानंतर हेनरिक क्लासेनने भुवनेश्वरसह डाव सांभाळला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. यादरम्यान क्लासेनने ३५ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु १८९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी ते पुरेसे नव्हते. मोहम्मद शमीच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात हेन्रिक क्लासेनही डावाच्या १७व्या षटकात बाद झाला. त्याची विकेट पडताच गुजरातच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर भुवनेश्वरही २७ धावा करून बाद झाला. अखेर हैदराबाद संघाला नऊ गडी गमावून केवळ १५४ धावा करता आल्या. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. यश दयालला एक विकेट मिळाली.
शुभमन गिलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४