मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई पोलिसांनी मरोळ, अंधेरी येथील एका ३७ वर्षीय व्यक्तीला विमानतळ परिसरात प्रवेश मिळवण्यासाठी खोटे विमान तिकीट तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे. या व्यक्तीवर आता अजामीनपात्र फौजदारी खटल्याचा गुन्हा नोंदवला आहे, ज्यामध्ये सात वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विस्तारा एअरलाइन्सच्या कर्मचार्यांनी १४ मे रोजी नूर आलम मोहम्मद कय्युम शेख नावाच्या एका प्रवाशाला पकडले, जो मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या युके९५० विमानाचे तिकीट घेऊन विमानतळाच्या प्रस्थानाच्या आवारात प्रवेश केला होता. त्याच्या तिकिटाचा तपशील तपासल्यावर असे आढळून आले की, असे कोणतेही तिकीट विमान कंपनीने कोणत्याही प्रवाशाला दिले नव्हते. त्यामुळे शेखला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ताब्यात देण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली.
तपासादरम्यान, त्याने आठवडाभरापूर्वी त्याचा विमानतळावर युके९५० ह्या विमानाने मुंबईहून दिल्लीला जात असताना त्याचा मोबाईल फोन हरवला होता. परंतु, कामाच्या गडबडीत तो हरवलेल्या फोनबद्दल तक्रार करू शकला नाही. त्याने मोबाईल फोन नेमका कुठे हरवला हे पाहण्यासाठी सीसीटीव्हीतली दृष्य पाहून विमानतळ प्रस्थान क्षेत्राचा परिसर तपासण्यासाठी त्याने खोटे विमान तिकीट वापरून विमानतळावर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सीआयएसएफच्या कर्मचार्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्याने संगणकाचा वापर करून त्याच्या आठवडाभराच्या जुन्या प्रवासाच्या विमान तिकिटाची तारीख बदलली आणि तीच खरी म्हणून वापरून विमानतळावर प्रवेश मिळवला. परंतु विस्तारा एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या संशयास्पद हालचालींवरून त्याला पकडले आणि सीआयएसएफच्या ताब्यात दिले, सीआयएसएफच्या जवानांनी एफआयआर मध्ये म्हटले आहे. शेखवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ४२० (फसवणूक), ४६५ (बनावट), ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे) आणि ४७१ (खोटे कागदपत्र म्हणून वापरणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजामीनपात्र फौजदारी खटल्याचा गंभीर आरोप असलेल्या गुन्ह्यात शेखची चौकशी सुरु आहे.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४