IPL:चेन्नई अंतिम फेरीत; धोनीच्या अनुभवापुढे हार्दिकच्या संघाची वाताहत

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी १०व्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी मंगळवारी (२३ मे) क्वालिफायर-१ मध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. चेन्नईचा गुजरातवर चार सामन्यांतील हा पहिला विजय आहे. याआधी सीएसकेला तिन्ही सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. धोनीचा संघ आता रविवारी (२८ मे) पाचव्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने २० षटकांत ७ विकेट गमावत १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ २० षटकांत १५७ धावांवर गारद झाला.

चार वेळच्या चॅम्पियन चेन्नई संघाने शानदार पुनरागमन केले आहे. गेल्या मोसमात ते प्लेऑफमध्येही पोहोचले नव्हते. यावेळी धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आणि त्यानंतर विजेतेपदापर्यंत मजल मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. गुजरात टायटन्सला या पराभवानंतर अंतिम फेरी गाठण्याची दुसरी संधी मिळेल. अहमदाबाद येथे २६ मे रोजी क्वालिफायर-२ मध्ये ते खेळणार आहेत. तिथे ते मुंबई इंडियन्स किंवा लखनौ सुपर जायंट्सशी स्पर्धा करतील. बुधवारी (२४ मे) मुंबई आणि लखनऊ यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर-२ मध्ये गुजरातविरुद्ध खेळेल.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ६० धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने ४० धावांचे योगदान दिले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने १६ चेंडूत २२ धावा केल्या. अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडूने प्रत्येकी १७ धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक धाव काढली. मोईन अलीने चार चेंडूत नऊ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. दर्शन नळकांडे, नूर अहमद आणि रशीद खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

१७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. याचा फटका त्यांना सहन करावा लागला. गुजरातकडून शुभमन गिलने ३८ चेंडूत सर्वाधिक ४२ धावा केल्या. या सामन्यात त्याला गेल्या दोन सामन्यांप्रमाणे अप्रतिम कामगिरी करता आली नाही. गिलने सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली होती, मात्र यावेळी तो अर्धशतकही झळकावू शकला नाही. राशिद खानने शेवटच्या षटकात झटपट धावा दिल्या. त्याने संघाच्या आशा उंचावल्या, पण त्याला विजय मिळवता आला नाही. राशिदने १६ चेंडूत ३० धावा केल्या. दासून शनाकाने १७, विजय शंकरने १४ आणि वृद्धिमान साहाने १२ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्या आठ, मोहम्मद शमी पाच, डेव्हिड मिलर चार आणि राहुल तेवतिया तीन धावा करून बाद झाले. नूर अहमदने नाबाद सात धावा केल्या. दर्शन नळकांडेला खाते उघडता आले नाही. चेन्नईकडून दीपक चहर, महेश तिक्क्षाना, रवींद्र जडेजा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तुषार देशपांडेला एक यश मिळाले.

रवींद्र जडेजाने आयपीएलमध्ये १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याने २२५ आयपीएल सामन्यात १५१ विकेट घेतल्या असून २६७७ धावा केल्या आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात जडेजाने आयपीएलमधील १५० बळी पूर्ण केले. यासह, तो आयपीएलमध्ये १५० बळी घेणारा आणि १००० हून अधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आणि अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. गुजरातविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रवींद्र जडेजाने दासून शनाकाला बाद करून हा खास विक्रम केला. या सामन्यात त्याने डेव्हिड मिलरलाही बाद केले. जडेजाने चार षटकांत केवळ १८ धावा देत दोन बळी घेतले.

जडेजाच्या आधी ड्वेन ब्राव्हो आणि सुनील नरेन यांनीही ही कामगिरी केली आहे. ड्वेन ब्राव्होने आयपीएलमध्ये १६१ सामने खेळले आणि १५६० धावा केल्या. त्याचबरोबर १८३ विकेट्सही घेतल्या. ब्राव्होने क्षेत्ररक्षण करताना ८० झेलही घेतले. ब्राव्होनंतर सुनील नरेनने ही कामगिरी केली. नरेनने आतापर्यंत आयपीएलमध्ये १०४६ धावा केल्या असून १६३ विकेट्सही घेतल्या आहेत. विकेट घेण्याच्या बाबतीत जडेजा या दोघांच्या मागे असू शकतो, पण आयपीएल इतिहासात २५०० हून अधिक धावा करणारा आणि १५० हून अधिक बळी घेणारा तो पहिला खेळाडू आहे.

ऋतुराज गायकवाडला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार