मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२३च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई क्वालिफायर-२ मध्ये पोहोचली तर लखनौचा संघ तंबूमधून थेट घरी परत जायला निघाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ८ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संपूर्ण संघ १०१ धावांत तंबूमध्ये परतला. मुंबईच्या आकाश मधवालने ५ धावांमध्ये ५ बळी घेतले.
मुंबईने दिलेल्या १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. मार्कंड तीन धावा करून बाद झाला तेव्हा धावसंख्या १२ होती. काइल मेयर्स १८ धावा करून बाद झाला. कृणाल पांड्यानेही निराशा केली. त्याला केवळ ८ धावा करता आल्या. मार्क स्टॉईनिशने (४०) एक बाजू लावून धरली. आयुष बडोनी एक धाव काढून बाद झाला. त्याचवेळी निकोलस पूरन खाते न उघडता परतला. मधवालने दोन चेंडूत लखनौला दोन मोठे धक्के दिले. त्यामुळे घाबरलेला लखनौचा संघ दबावाखाली एकापाठोपाठ एक विकेट गमावत होता. लखनौचे तीन फलंदाज धावबाद झाले. स्टॉईनिश, कृष्णप्पा गौतम आणि दीपक हुडा यांनी मुंबईला विकेट्स भेट दिल्या. लखनौचे ८ फलंदाज दुहेरी आकड्यालाही स्पर्श करू शकले नाहीत. मुंबईतर्फे आकाश मधवालने ३.३ षटकांत पाच धावा देत पाच बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या मुंबईने दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा ११ धावा करून बाद झाला. किशनने १५ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन आणि सूर्या यांनी ३८ चेंडूत ६३ धावांची भागीदारी केली. कॅमेरून ग्रीनने ४१ धावांची खेळी केली. सूर्याने ३३ धावा केल्या. तिलक वर्माने २६ आणि टीम डेव्हिडने १३ धावांचे योगदान दिले. नेहल वढेराने १२ चेंडूत २३ धावांची खेळी केली. नवीन-उल-हकने ४ बळी घेतले. त्याचवेळी यश दयालने ३ बळी घेतले. मोहसीनला एक विकेट मिळाली. या विजयासह मुंबईने क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. येथे त्यांची लढत गुजरात टायटन्सशी होईल.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आंद्रे रसेलने २०२१च्या हंगामात कोलकाताकडून खेळताना मुंबईच्या ५ फलंदाजांना १५ धावांमध्ये बाद केले होते. आज आकाश मधवालने ५ धावांत ५ गडी बाद केले आणि नवा विक्रम स्वतःच्या नावावर कोरला.
आकाश मधवालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४