IPL:मुंबई इंडियन्सचा क्वालिफायर-२ मधील रेकॉर्ड कसा आहे; ‘एल-क्लासिको’ फायनल चेन्नईसोबत निश्चित आहे का?

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला आहे. तेथे त्यांचा शुक्रवारी (२६ मे) गतविजेत्या गुजरात टायटन्सशी सामना होईल. साखळी फेरी संपल्यानंतर मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. तो एलिमिनेटरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघासोबत खेळणार होता. मुंबईने अंतिम फेरी गाठण्याचा पहिला अडथळा पार केला आणि एलिमिनेटरमध्ये लखनौचा पराभव केला.

मुंबई आतापर्यंत पाच वेळा आयपीएल चषक उंचावण्याचा मान प्राप्त केला आहे. सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी गुजरातवर मात करावी लागेल. या मोसमात दोन्ही संघ तिसऱ्यांदा समोरासमोर असतील. मुंबईने एक सामना तर गुजरातने एक सामना जिंकला आहे. त्यांचा गुजरातविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. मुंबईने तीनपैकी दोन सामने जिंकले असून एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मुंबईचा संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यात पाच वेळा यश मिळाले आहे. २०१० मध्ये मुंबई पहिल्यांदा फायनल खेळली होती. त्यानंतर त्यांना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हापासून, मुंबई संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये अंतिम फेरी गाठली आणि प्रत्येक वेळी विजय मिळवला. सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून ते एक पाऊल दूर आहेत.

२०११च्या आयपीएलमध्ये प्लेऑफ फॉर्मेट सादर करण्यात आला होता. तेव्हापासून मुंबई संघ तीन वेळा क्वालिफायर-२ मध्ये खेळला आहे. या फेरीचा त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यांनी क्वालिफायर-२ मध्ये दोनदा विजय मिळवला आहे. एकदा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

क्वालिफायर-२ मधील मुंबईचा गुजरातविरुद्ध वरचष्मा असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत मुंबईचा संघ गुजरातला हरवण्यात यशस्वी ठरला तर आयपीएलची अंतिम फेरी ‘एल-क्लासिको’ होईल. ‘एल-क्लासिको’ हा स्पॅनिश शब्द आहे. तो क्लासिक इंग्रजी शब्दाच्या जागी वापरला जातो. ला लीगा म्हणजेच स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये बार्सिलोना आणि रिअल माद्रिदच्या संघर्षासाठी याचा वापर केला जातो. दोन प्रतिस्पर्ध्यांमधील सामना एल क्लासिको म्हणून ओळखला जातो. आता आपल्या उत्कृष्ट विक्रमाच्या जोरावर मुंबई अंतिम फेरीत पोहोचते की नाही हे पाहावे लागेल. अंतिम फेरीत पोहोचल्यास पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तो संघर्ष बघायला क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार