मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २१४ धावा केल्या. त्यानंतर पावसाने हस्तक्षेप करून अडीच तासांचा खेळ वाया घालवला. सामना मध्यरात्री १२:१० वाजता पुन्हा सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला ११५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. या विजयासह चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावण्याच्या मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गुजरातकडून साई सुदर्शनने शानदार खेळी केली. त्याचे शतक हुकले आणि तो ४७ चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ९६ धावा काढून बाद झाला. यानंतर चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने २५ चेंडूत सर्वाधिक ४७ धावा केल्या.
शेवटच्या तीन षटकात चेन्नईला विजयासाठी ३८ धावांची गरज होती. १३व्या षटकात मोहित शर्मा गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी अंबाती रायडू आणि शिवम दुबे खेळपट्टीवर होते. शेवटचा सामना खेळणाऱ्या अंबाती रायडूने पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि एक चौकार लगावला. चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. मात्र, त्याने सामना चेन्नईच्या बाजूने वळवला. पुढच्याच चेंडूवर धोनी खाते न उघडता बाद झाला. या षटकात १७ धावा झाल्या. १४व्या षटकात मोहम्मद शमीच्या षटकात आठ धावा झाल्या. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १३ धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूत तीन धावा झाल्या. शेवटच्या दोन चेंडूत १० धावांची गरज होती. रवींद्र जडेजा स्ट्राइकवर होता. जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.
गुजरात टायटन्सने शानदार फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. आयपीएल अंतिम सामन्यामधील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या होत्या.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. शुभमनला सातव्या षटकात महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टिचित केले. त्याला २० चेंडूत ३९ धावा करता आल्या. यामध्ये सात चौकारांचा समावेश आहे. यानंतर वृद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. दरम्यान, साहाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला दीपक चहरने धोनीच्या हाती झेलबाद केले. साहा ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५४ धावा करून बाद झाला. यानंतर सुदर्शन आणि कर्णधार हार्दिकने तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. सुदर्शनने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत ४७ चेंडूत ९६ धावा केल्या. आयपीएल २०२३ मधील हे त्याचे तिसरे अर्धशतक होते. सुदर्शनचे शतक हुकले. २०व्या षटकात मथिशा पाथिरानाने त्याला पायचीत टिपले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर रशीदला पाथीरानाने ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. हार्दिकने १२ चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. चेन्नईकडून पाथीरानाने दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी दीपक चहर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तुषार देशपांडे चांगलाच महागात पडला. त्याच्या चार षटकांत ५६ धावा निघाल्या.
गुजरातच्या डावानंतर चेन्नईचा डाव सुरू झाला आणि तीन चेंडूंनंतर पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय आला. यामुळे सुमारे अडीच तासांचा खेळ वाया गेला. मध्यरात्री १२:१० वाजता पुन्हा खेळ सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. तीन चेंडू खेळले होते, म्हणजेच चेन्नईला ८७ चेंडूत १६७ धावा करायच्या होत्या. त्यांच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकही विकेट पडली नव्हती आणि ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे खेळपट्टीवर होते. पॉवरप्लेमध्ये चार षटके होती आणि गुजरातचा एक गोलंदाज तीन षटके टाकू शकत होता.
चेन्नईने शानदार सुरुवात केली आणि ऋतुराज-कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. नूर अहमदने सातव्या षटकात दोन्ही सलामीवीरांना तंबूमध्ये परत पाठवले. ऋतुराज १६ चेंडूत २६ धावा करून बाद झाला तर कॉनवेने २५ चेंडूत ४७ धावा केल्या. ऋतुराजने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला, तर कॉनवेने चार चौकार आणि दोन षटकार मारले. यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. रहाणेने १३ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावांची मौल्यवान खेळी केली. यानंतर अंबाती रायडूने आठ चेंडूंत १९ धावांची तुफानी खेळी केली. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. धोनीला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी जडेजाने सहा चेंडूंत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५ धावांची नाबाद खेळी केली. तर शिवम दुबे २१ चेंडूत ३२ धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने दोन षटकार मारले. गुजरातकडून मोहित शर्माने तीन आणि नूर अहमदने दोन गडी बाद केले.
डेव्हॉन कॉनवेला सामनावीर तर शुभमन गिलला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले. गिलने स्पर्धेतील १७ सामन्यांत मिळून ८९० धावा काढल्या. त्यात ३ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट धावसंख्या १२९ होती. आयपीएलमध्ये त्याने आजवर ९० सामन्यांतल्या ८७ डावांत मिळून २७५१ धावा काढल्या आहेत. त्यात ३ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. ही तिन्ही शतकं त्याने २०२३च्या हंगामातच झळकावली आहेत.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४