जळगाव सायबर विभागाने आरोपीस भावनगर येथून केली अटक,पाच लाख रुपये केले हस्तगत.
जळगाव: ऑनलाइन व्यापारात गुंतवणूक करून दुप्पट नफ्याचे आमिष दाखवीत एकाला सुमारे साडेनऊ लाखांची फसवणूक करणार्या तरुणाला भावनगरमधून (गुजरात) सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली.
त्याच्याकडून सुमारे पाच लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. विजय दयाभाई कलसरिया ऊर्फ अजय (वय ३३, रा. अम्रेली, गुजरात) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
रावेर येथील बागायतदार बर्हाटे यांना व्हॉटसअॅप व भ्रमणध्वनीवर संपर्क करीत ऑनलाइन व्यापारात गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा होईल, असे आमिष दाखविले. नंतर अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडत त्यांची नऊ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. १४ डिसेंबर २०२२ ते १ एप्रिल २०२३ दरम्यान त्यांच्याकडून रक्कम घेतली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर बर्हाटे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, संदीप साळवे, ईश्वर पाटील यांच्या पथकाने व्हॉट्सअॅपचे लघुसंदेश, संपर्क, ऑनलाइन ट्रेडिंग अॅप्लिकेशन, यासह बँकेतील माहितीच्या अनुषंगाने तपास केला. संशयित गुजरातमधील भावनगरातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा रचत विजय दयाभाई कलसरिया ऊर्फ अजय याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून फसवणुकीच्या रकमेतील पाच लाखांची रोकड हस्तगत केली.
दरम्यान, संशयित हा फसवणूक करणार्या टोळीतील सदस्य व मध्यस्थी असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. टक्केवारी ठरवून आलेले पैसे तो बँकेतून काढत टोळीला देण्याचे काम करीत होता. पोलिसांनी फिर्यादीची रक्कम वर्ग झालेले संबंधित खाते बँकांच्या मदतीने गोठवले. त्यामुळे टोळीतील म्होरक्याने कलसरियाकडून पैसे घेणे थांबविले होते. त्यामुळे त्याच्याकडील शिल्लक पाच लाख त्याने काढून दिले. बँक खाते गोठविल्याने फिर्यादीचे एक लाख रुपये वाचल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






