मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने तीन गडी गमावून १६४ धावा केल्या. भारतीय संघाने ४० षटकांत ४.१ च्या धावगतीने धावा जमा केल्या. भारताला शेवटच्या दिवशी ९० षटकांत २८० धावा करायच्या आहेत आणि सात फलंदाज शिल्लक आहेत. चौथ्या दिवशी विराट कोहली ६० चेंडूत ४४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला आणि अजिंक्य रहाणेने ५९ चेंडूत २० धावा केल्या. आतापर्यंत या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ११८ चेंडूत ७१ धावांची भागीदारी झाली आहे.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने ८ बाद २७० धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४६९ धावा केल्या होत्या आणि भारताने २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला १७३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यात ऑस्ट्रेलियाने २७० धावांची भर घालून ४४३ धावांची आघाडी घेतली आणि भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवातही उत्कृष्ट झाली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलच्या वादग्रस्त झेलने भारताला पहिला धक्का बसला. खरं तर, स्लिपमध्ये झेल घेत असताना, चेंडू ग्रीनच्या हातात अडकला आणि तो जमिनीवर घासला, पण तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केलं. समालोचन करताना दीप दासगुप्ता आणि हरभजन सिंगने शुभमनला नाबाद म्हंटले. पंचांच्या निर्णयाचा रोहित शर्मा आणि खुद्द शुभमन यांना विश्वास बसत नव्हता. शुभमनला १९ चेंडूत १८ धावा करता आल्या. दिवसाचा खेळ संपल्यानंतर शुभमनने स्वतः या घटनेचे छायाचित्र समाज माध्यमातून सामायिक केले.
त्यानंतर टीम इंडियाने सलग दोन षटकांत दोन विकेट गमावल्या. भारतीय फलंदाजाच्या खराब फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाला या दोन्ही विकेट मिळाल्या. २०व्या षटकाच्या सुरुवातीला चांगली फलंदाजी करणारा कर्णधार रोहित शर्मा ऑफस्पिनर नॅथन लायनच्या स्वीप शॉटच्या वेळी पायचीत बाद झाला. त्याला ६० चेंडूत ४३ धावा करता आल्या. रोहितने पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी ७७ चेंडूत ५१ धावांची भागीदारी केली. यानंतर, पुढच्याच षटकात पॅट कमिन्सला अप्पर कट मारताना पुजाराने विकेट गमावली. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीपर्यंत पोहोचला. पुजाराला ४७ चेंडूत २७ धावा करता आल्या. या दोघांच्या विकेट्सनंतर कोहली आणि रहाणेने सावध फलंदाजी करत खराब चेंडू सीमापार नेले. आता पाचव्या दिवशी या दोघांकडून खूप अपेक्षा असतील.
ओव्हल मैदानावर चौथ्या डावात आतापर्यंत सर्वाधिक २६३ धावांचे लक्ष्य गाठले गेले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २००३ मध्ये वेस्ट इंडिजने अँटिग्वा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन गडी राखून विजय मिळवला तेव्हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च लक्ष्य ४१८ होते. म्हणजेच भारताने ही कसोटी जिंकली तर इतिहास रचला जाईल.
१९०२ च्या ऍशेस मालिकेत इंग्लंडने ओव्हलवर यापूर्वीचे विक्रमी लक्ष्य एक बाद २६३ धावांचे होते. या मैदानात दोनदा २५० हून अधिकचे लक्ष्य गाठण्यात आले आहे. इंग्लंडशिवाय वेस्ट इंडिजने १९६३ मध्ये २ विकेट्सवर २५५ धावा केल्या होत्या. भारतीय संघ १९७९ मधील त्यांच्या कामगिरीपासून प्रेरणा घेऊ शकतो जेव्हा सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली, ४३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, अनिर्णित कसोटीत भारतीय संघ आठ गडी गमावून ४२९ धावा करू शकला होता. ओव्हलवर दोनदा ३०० पेक्षा जास्त धावा करणारा भारत हा एकमेव संघ आहे. २०१८ मध्ये, संघ ४६४ धावांचा पाठलाग करताना ३४५ धावा करू शकला. तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ४३८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने ४२९ धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारी चार बाद १२३ धावांवर खेळायला सुरूवात केली. त्यांनी एकूण १४७ धावा जोडल्या आणि चार विकेट गमावल्या. अॅलेक्स कॅरीने नाबाद ६६ धावांचे सर्वाधिक योगदान दिले. त्याने स्टार्क (४१) सोबत सातव्या विकेटसाठी १२० चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली. उपाहारानंतर तासाभराने कर्णधार पॅट कमिन्सने डाव संपल्याची घोषणा केली. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी २६ षटके टाकली, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना ७८ धावा करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अॅलेक्स कॅरीने पहिल्या सत्रात ६१ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यावेळी स्टार्क ११ धावांवर खेळत होता.
चौथ्या दिवसाची सकाळ पहिल्या तीन दिवसांपेक्षा जास्त उष्ण होती. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना खेळपट्टीची खूप मदत मिळत होती. दिवसाच्या तिसऱ्या षटकात मार्नस लबुशेनला (४१) उमेश यादवने बाद केले. उमेश आणि शमीने जुना चेंडू रिव्हर्स स्विंग करण्याचा प्रयत्न केला. सातत्याने चांगली गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजचा एक चेंडू कॅमेरून ग्रीनच्या खांद्यावरही आदळला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने आठ षटकांनंतर डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाकडे चेंडू सोपवला. त्याने चेंडूला जास्तीत जास्त टर्न घेण्याचा प्रयत्न केला आणि कॅमेरॉन ग्रीनला (२५) त्रिफळाचीत केले. त्याचवेळी शमीने स्टार्कला कोहलीकरवी झेलबाद केले.
तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना अजिंक्य रहाणेच्या बोटाला दुखापत झाली. चौथ्या दिवशी खबरदारी म्हणून तो क्षेत्ररक्षणावर उतरला नाही. रहाणेच्या ८९ आणि शार्दुल ठाकूरसोबतच्या १०९ धावांच्या भागीदारीमुळे भारताला फॉलोऑन टाळता आला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने ५८ धावांत तीन, मोहम्मद शमीने ३९ धावांत दोन, उमेश यादवने ५४ धावांत दोन बळी घेतले. आता भारतासमोर रविवारी ९० षटकांत २८० धावा करण्याचे आव्हान आहे.