नवी दिल्ली : एकीकडे थंडी ओसरू लागली असतानाच दुसरीकडे पावसाने लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. 3 मार्चपर्यंत उत्तर-पश्चिम भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे
कोणत्या राज्यात पाऊस पडेल?
हवामान विभागाच्या (IMD) मते, 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याशिवाय या भागात बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. त्याच वेळी, 2 मार्च रोजी उत्तर-पश्चिम भारताच्या लगतच्या मैदानी भागात पाऊस पडू शकतो. यादरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये पाऊस पडेल.
दरम्यान, पुढील 24 तासांत दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरासह दक्षिण अंदमान समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान अंदमान निकोबार बेटांवर सुसाट वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. दरम्यान येथील वारे 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. येथील वाऱ्यांचा वेग 60 किमी प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मात्र याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. पुढील पाचही दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. पण कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. मागली काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. त्यामुळे दिवस कडक उन्हाचा चटका आणि रात्री थंडगार वारे सुटत आहेत.