मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालण्याचा निर्णय घेतला आहे, तर आता राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी एसटीने ही गणेश भक्तांसाठी धाव घेतली आहे. आजपासून संगणकीय आरक्षण सुरू झाले असून काही दिवसांनी समूह आरक्षण सुरू होणार आहे.
गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मुंबईकर चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक कोकणवासी गावी जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळ सज्ज झाले असून, एसटीने कोकणवायीयांसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त २३१० जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
समूह आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून मागील वर्षी १२६८ बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी ८७२ बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा महिलांना तिकीट मध्ये ५० टक्के सवलत मिळणार असून, ७५ वर्षांवरील नागरिकांना प्रवास मोफत असणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बसगाड्यांची संख्या एसटी महामंडळाला वाढवावी लागणार आहे.
यंदा श्री गणेश चतुर्थी ही १९ सप्टेंबर रोजी असल्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जाणाऱ्या बसगाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून, १९ जुलै रोजी रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे आरक्षण सुरू होईल.