भारताने सात वर्षांनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिका गमावली; हार्दिकच्या नेतृत्वाखाली पहिला पराभव

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने ही टी२० मालिकाही ३-२ ने जिंकली आहे. लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १८ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिज संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते.

मालिकेत चुरस कायम ठेवताना टीम इंडियाने पुनरागमन करत तिसरा आणि चौथा टी२० सामना जिंकला. मात्र, पाचवा टी२० सामना गमावण्याबरोबरच भारतीय संघाने मालिकाही गमावली. निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी वेस्ट इंडिजसाठी १०७ धावांची भागीदारी करून भारताला सामना आणि मालिका जिंकण्यापासून दूर ठेवले. ब्रँडन किंग ५५ चेंडूत ८५ धावा करून नाबाद राहिला. मात्र, पाचव्या टी२० सामन्यात चार षटकात ३१ धावा देऊन चार बळी घेणाऱ्या रोमारियो शेफर्डला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचवेळी मालिकेत १७६ धावा करणाऱ्या निकोलस पूरनला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

वेस्ट इंडिज संघाने सात वर्षांनंतर भारताविरुद्ध द्विपक्षीय टी२० मालिका जिंकली आहे. शेवटच्या वेळी वेस्ट इंडिजने २०१७ मध्ये घरच्या मैदानावर भारताविरुद्ध टी२० मालिका १-० ने जिंकली होती. त्यानंतर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची पाच टी२० मालिका जिंकल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडियाला अशा संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे, जो २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेत सुपर-१२ फेरीसाठीही पात्र ठरू शकला नाही. २०२४ मध्ये टी२० विश्वचषक वेस्ट इंडिज-यूएसए सह-यजमानांमध्ये खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत या मालिकेकडे तयारी म्हणून पाहिले जात होते, मात्र टीम इंडियाने निराशा केली.

टीम इंडियाने पहिल्यांदाच पाच सामन्यांची टी२० मालिका गमावली. भारताने आतापर्यंत पाच वेळा पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली आहे. टीम इंडियाने २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३-२ आणि २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३-२ असा विजय मिळवला होता. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली होती. २०२२ मध्येच भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला होता. त्याचवेळी, आता प्रथमच पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. त्याचवेळी टीम इंडियाला दोन वर्षांनंतर टी२० मालिकेत पराभव पत्करावा लागला. शेवटच्या वेळी टीम इंडियाने जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका गमावली होती. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध या मालिकेसह एकूण १३ टी२० मालिका खेळला. त्यापैकी टीम इंडियाने ११ मालिका जिंकल्या. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत होती, तर आता वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या आठ टी२० मालिकेत भारताचा पराभव झाला नव्हता, मात्र आता ही विजयाची मालिकाही खंडित झाली आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच टी२० मालिका पराभव आहे. आतापर्यंत त्याने पाच टी२० मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यातील एकमेव पराभव वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत झाला, तर मागील चार मालिकांमध्ये टीम इंडियाने बाजी मारली होती. यामध्ये आयर्लंड विरुद्ध २-०, न्यूझीलंड १-०, श्रीलंका २-१ आणि न्यूझीलंड २-१ विजयांचा समावेश आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. पावसानेही सामन्यावर कहर केला, पण पंचांना सामना पूर्ण २० षटके खेळवण्यात यश आले. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारताने पहिल्याच षटकात यशस्वी जैसवालची विकेट गमावली होती. त्याला चार चेंडूत पाच धावा करता आल्या. यानंतर शुभमन गिलही तिसऱ्या षटकात नऊ चेंडूत नऊ धावा काढून तंबूमध्ये परतला. अकील हुसेनने दोघांनाही बाद केले. १७ धावांत दोन गडी गमावल्यानंतर भारतीय डाव तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रोस्टन चेसने स्वतःच्याच चेंडूवर उत्कृष्ट झेल घेत तोडली. त्याच्याच चेंडूवर त्याने तिलकचा झेल घेतला. तिलक १८ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावा करून बाद झाला. दरम्यान, सूर्यकुमार यादवने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील १५ वे अर्धशतक झळकावले. त्याने ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अल्झारी जोसेफच्या चेंडूवर षटकार ठोकत सूर्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. संजू सॅमसन, कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा एकदा अपयशी ठरले. सॅमसन नऊ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १३ धावा करून बाद झाला तर हार्दिक १८ चेंडूंत एका षटकाराच्या मदतीने १४ धावा करून बाद झाला. अक्षर पटेल १० चेंडूत १३ धावा करून बाद झाला तर, अर्शदीप सिंगने चार चेंडूत आठ धावा केल्या. कुलदीप यादवला खातेही उघडता आले नाही. सॅमसन, हार्दिक, अर्शदीप आणि कुलदीप यांना शेफर्डने बाद केले. अशाप्रकारे टीम इंडियाला १६५ धावा करता आल्या. शेफर्डशिवाय अकील हुसेन आणि होल्डरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रोस्टन चेसला एक विकेट मिळाली.

166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीज संघाला दुसऱ्या षटकातच पहिला धक्का बसला. अर्शदीप सिंगने काईल मेयर्सला यशस्वी जैसवालकरवी झेलबाद केले. त्याला पाच चेंडूत १० धावा करता आल्या. यानंतर ब्रँडन किंग आणि निकोलस पूरन यांनी शानदार फलंदाजी करत भारताच्या हातून सामना हिसकावून घेतला. पूरन आणि किंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. पूरणला तिलक वर्माने हार्दिक पंड्याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याने ३५ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. पूरनने आपल्या खेळीत एक चौकार आणि चार षटकार ठोकले. तिलकच्या आंतरराष्ट्रीय आणि टी२० कारकिर्दीतील ही पहिली विकेट होती. दरम्यान, ब्रँडन किंगने टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. त्याने शाई होपसोबत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. ब्रँडन किंगने ५५ चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा केल्या. त्याचवेळी होपने १३ चेंडूत २२ धावांची नाबाद खेळी खेळली. भारताकडून अर्शदीप आणि टिळक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आशिया चषक स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ ‘अ’ गटात आहेत. तर ‘ब’ गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कँडीमध्ये होणार आहे. भारतीय संघ २ सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर ४ सप्टेंबरला त्याच मैदानावर त्यांचा सामना नेपाळशी होणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार