क्रिप्टोकरन्सीत जास्त नफा असल्याचे भासवून, नागरिकांच्या बॅंक खात्याचा वापर करणारा सायबर टोळीचा म्होरक्यास केले जेलबंद.

Spread the love

जळगाव : नागरीकांना पैशांचे आमीष दाखवुन त्यांच्या नावे चालु व बचत बँक खाते उघडून त्या बँक खात्यांचा वापर सायबर गुन्हे करण्यासाठी वापरणा-या सायबर ठगास जळगाव सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
नागरीकांना त्याच्या व्हॉट्सअप वर +44, +88, 92, +97 अशा क्रमांकाने सुरु होणा-या परदेशातील विविध देशांचे कोड असलेल्या क्रमांकावरुन व्हॉट्सअप मॅसेज प्राप्त होत आहे. त्यामध्ये नागरीकांना सुरुवातीला कोणतीही गुंतवणुक न करता दररोज 500 ते 1000 रुपये कमवा असे मॅसेज प्राप्त होत आहे.

व्हॉट्सअप क्रमांकावर आलेले यु ट्युब व्हिडीओ आणि अ‍ॅमेझॉन, मेशो, मिंत्रा, फ्लिपकार्ट, अजो यावरील ऑनलाईन उत्पादनाला लाईक करण्याचे विविध प्रकारचे टास्क देवून नागरीकांना त्यांच्या बँक खात्यात सुरुवातीला रुपये पाचशे पासून ते 5000 रुपयांपर्यतची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात ऑनलाईन पाठवली जाते. या अमिषाला बळी पडल्यानंतर खातेधारकास प्रिपेड टास्क दिला जातो. त्यामधे खातेधारक नागरीकांना सुरुवातीला कमीत कमी 1000 रुपये गुंतवणुक करण्यास सांगितली जाते. 1000 रुपयांवरती 200 ते 300 रुपये कमीशन दिले जाते. त्यानंतर हळुहळु त्यांचे कडुन प्रिपेड टास्कसाठी पैसे घेतले जातात.बॅंक खातेधारक नागरिकांना नफा म्हणून त्यांनी जमा केलेल्या रकमेवर 1000 ते 1500 रुपये नफा दिला जातो. त्यानंतर त्यांना टेलिग्राम गृपला अॅड केले जाते. त्यामध्ये त्यांना क्रिप्टोकरन्सी बाबत माहिती दिली जाते. त्यामध्ये आपण गुंतवणुक केल्यास मोठया प्रमाणावर नफा मिळतो. सुरुवातीला बनावट क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग वेबसाईट वर त्यांना युजर आयडी व पासवर्ड तयार करुन दिला जातो. त्यानंतर त्यांना त्यामध्ये गुंतवणुक करण्यास सांगितली जाते. सुरुवातीला त्यांना मोठ्या प्रमाणावर नफा देवून मोठी गुंतवणूक करण्याचे आमीष दाखवले जाते.

अशा मोहास बळी पडून जळगांव शहरातील तक्रारदार पवन बळीराम सोनवणे यांची 15 लाख 35 हजार रुपयांना फसवणुक करण्यात आली होती. या फसवणूकीच्या घटनेत फिर्यादी पवन सोनवणे यांनी एका बॅंक खात्यात ऑनलाईन 15 लाख 35 हजार रुपये ऑनलाईन जमा केले होते. या गुन्ह्याचे सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषन केले. फिर्यादी पवन सोनवणे यांनी ज्या सात बॅंक खात्यात रक्कम जमा केली होती ते बॅंक खाते भारतातील विविध राज्यातील आहेत.
या गुन्हयात श्रीनगर येथील आरोपीस अटक करण्यात आली आहे. तसेच एक आरोपी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आला आहे. ऑनलाईन फ्रॉडची रक्कम वळवण्यासाठी जी करंट आणि सेव्हिंग खाती लागतात त्या बॅंक खात्यांचे एटीएम, चेक बुक, बॅंक खात्याशी लिंक असलेले सिमकार्ड आदींचे किट संबंधीतास पाठवण्याचे काम मुंबई येथील आरोपी राकेश मिश्रा करत होता.

अटकेतील राकेश मिश्रा याच्याकडून विविध बँक खात्यांचे 150 चेकबुक, 178 सिमकार्ड, एटीएम कार्ड, एक इंटरनेट रुटर, एक लॅपटॉप, एक कॉम्प्युटर सिपीयु, दहा मोबाईल व एक प्रिंटर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात संबंधीत बॅंकाशी तातडीने पत्रव्यवहार करुन फिर्यादी पवन सोनवणे यांनी ऑनलाईन वळते केलेली रक्कम व बँक खाते डेबिट फ्रिज करण्यात आली आहेत. त्यामुळे फिर्यादी पवन सोनवणे यांचे बारा लाख रुपये रोखण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. या गुन्हयाच्या तपासात जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी. डी. जगताप यांनी व त्यांचे अधिनस्त असलेले सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

तपासाच्या अनुषंगाने फिर्यादी पवन सोनवणे यांना आलेले मोबाईल कॉल, व्हॉट्सअॅप मॅसेज, तसेच त्यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरलेले आहेत त्याबाबत संबंधीतांकडून वेळोवेळी आवश्यक ती माहीती प्राप्त करण्यात आली. गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण पोलिस उप निरीक्षक दिगंबर थोरात व पोहेकॉ दिलीप चिंचोले यांनी केले. गुन्हयातील आरोपीतांचा ठावठिकाणा निष्पन्न करण्यात त्यांना यश आले. आरोपी हा मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दिगंबर थोरात यांच्यासह पोहेकॉ प्रविण वाघ, पोहेकॉ राजेश चौधरी, पोहेकॉ दिलीप चिंचोले आदी तपास पथक मुंबई येथे रवाना झाले होते. त्यांनी राकेश मिश्रा यास घाटकोपर मुंबई येथून ताब्यात घेतले आहे.जळगाव शहर आणी जिल्ह्यातील नागरिकांना सायबर पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी स्वतःच्या नावाचे बँक खाते तसेच बँक खात्याची माहिती इतर कोणालाही देवु नये. अनोळखी व्यक्तींना आपले आधारकार्ड, पॅनकार्ड, ई-मेल आयडीची माहिती शेअर करु नये. याशिवाय कुणी बँक खाते उघडून कमीशन बेसवर वापरण्यास मागत असेल तर तात्काळ सायबर पोलीस स्टेशनला 0257-2229695 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार