मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य कामे करुन घेण्यासाठी दहशत व दबाव निर्माण करण्याच्या समाजकंटकांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर, वर्ष २०१७ मध्ये भा.दं.वि. कलम ३५३ व ३३२ मध्ये स्वागतार्ह सुधारणा झाली होती व त्यामुळेच लोकसेवकांवरील हल्ले व शासकीय कामकाजात अडथळा आणणाऱ्या दुष्प्रवृत्तींना आळा बसून, अशा घटनांमध्ये कमालीची घट झाली होती. तथापि, सद्यःस्थितीत भा.दं.वि. कलम ३५३ च्या संरक्षणात्मक तरतुदीत तातडीने बदल करण्याची
शासनाची कार्यवाही पूर्णतः एकतर्फी आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी अशी आहे. कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच असलेल्या या कलमात दुरुस्ती करण्याच्या घोषणेनंतर समाजकंटकांचे धाडस वाढले असून, केवळ महिन्याभरातच राज्यभरात सहा ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण – दमबाजीच्या घटना घडल्या आहेत. राज्य शासनाची ध्येयधोरणे व विकास कामे तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रभावीपणे करण्याची जबाबदारी शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आहे. तथापि, भा.प्र.से. अधिकाऱ्यांसह, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ व धमकावण्याच्या सातत्याने होत असलेल्या घटना निश्चितच चिंताजनक आणि संतापजनक आहेत, असे महासंघाचे मुख्य सल्लागार श्री. ग. दि. कुलथे यांनी सांगितले.
महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई म्हणाले की, अधिकारी महासंघाने राज्य शासनाला वारंवार विनंती आर्जव करुन देखील कलम ३५३ मधील संरक्षणात्मक तरतुदी निष्प्रभ करण्याची कार्यवाही प्रस्तावित केल्यानेच, संतप्त अधिकाऱ्यांनी महासंघाच्या नेतृत्वामध्ये आज १५ सप्टेंबर रोजी शासनाच्या या एकतर्फी कार्यवाहीचा निषेध करुन शासकीय कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाण – दमबाजीच्या वाढत्या प्रकरणांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, मंत्रालयासह राज्यभरांतील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर उग्र निदर्शने केली.
या उपरांत शासनाकडून कलम ३५३ च्या संरक्षणात्मक तरतुदी पूर्ववत न केल्यास, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार राज्यभरातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
सदर आंदोलनात जुन्या पेन्शनविषयक शासननियुक्त समितीच्या अहवाल सादरीकरणास होत असलेल्या विलंबाकडे शासनाचे लक्ष वेधून, राज्य प्रशासनातील रिक्त जागा कंत्राटी पध्दतीने भरण्याच्या शासन धोरणास देखील तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यावेळी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि राजपत्रित अधिकारी तसेच कर्णधार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.