झुुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल : येथील नगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे प्रारूप प्रसिध्द करण्याचा कार्यक्रम घोषित झाला आहे. आधी प्रभाग संख्या 10 होती. आता ती 11 झाली आहे.
तसेच, पूर्वी नगरसेवकांची संख्या 20 व 2 स्वीकृत अशी 22 संख्या होती. आता ती 23 व 2 स्वीकृत अशी नगरसेवकांची संख्या ही 25 होणार आहे.
प्रभाग क्र 1 ते 10 मधून दोन नगरसेवक निवडून येणार आहे तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये तीन नगरसेवक हे निवडून येणार आहेत.
प्रभाग क्रमांक 2 हा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 3 हा अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण जागेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. प्रभाग क्र 1 ते 10 मध्ये मतदार संख्या ही 2700 ते 3000 मतदारांच्या आस पास आहे तर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये 4851 मतदार आहे व याच प्रभागातून तीन नगरसेवक हे निवडून येणार आहेत.
एरंडोल नगरपालिकेत एकूण 23 नगरसेवकांची संख्या असल्यामुळे आता बारा महिला नगरसेविका निवडून येणार आहेत.
सन 2011 च्या जनगणनेनुसार एरंडोल शहराची लोकसंख्या 34 हजार 114 आहे. यानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे प्रारूप प्रसिध्द करण्याचा कार्यक्रम घोषित झाला आहे. या प्रभाग रचनेचे प्रारूपवर 10 मार्च ते 17 मार्च दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती व सूचना कालावधीत नगरपालिकेत सादर करावेत. तसेच, हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करीता उपस्थित रहावे लागेल, असे एरंडोल नगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.