टेक्निशियन नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिेलेटर यंत्रणा धूळखात पडून…
प्रतिनिधी l अमळनेर :- तालुक्यातील हिंगोणे खु. येथील सर्पदंश झालेल्या महिलेचा धुळे येथील हिरे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिन्याभरात सर्पदंशामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सुस्थितीत आहे का ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खु. येथील रहिवासी रंजना आधार कोळी (वय ५७) ह्या आपल्या शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना त्यांच्या डाव्या पायावर विषारी सापाने चावा घेतला.
त्यांच्या मुलाने त्यांना अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे सांगितल्याने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना तपासले असता अमळनेर ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिेलेटर यंत्रणा हाताळण्यासाठी तंत्रज्ञ नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी धुळे येथे हलविण्याचे सांगितल्याने त्यांना अँब्युलन्सने धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आले. मात्र आधी अमळगाव, नंतर अमळनेर व त्यानंतर धुळे अश्या या सगळ्या धावपळीत वेळ वाया गेल्याने रंजना बाई यांची तब्येत अधिक खालावली. तेथे उपचार सुरू असताना चार दिवसांनी ६ रोजी रंजनाबाईंचा मृत्यू झाला.
धुळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येवून ती मारवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ संजय पाटील करीत आहेत.
दिनांक २९ रोजी डांगर येथील आकाश राजेंद्र भिल या शाळकरी विद्यार्थ्यांचा देखील व्हेंटिलेटर न मिळाल्याने आणि डांगर, जानवे, अमळनेर आणि धुळे अशा प्रवासात वेळ गेल्याने त्याचाही मृत्यू झाला होता.
तंत्रज्ञ उपलब्ध असते तर दोघांचा जीव गेला नसता…अमळनेरला एक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून चार कोटी निधी देखील उपलब्ध झाला होता. त्यानंतर कुठे माशी शिंकली हे कोणालाच माहित नाही. उपजिल्हा रुग्णालय झाले असते तर सर्व तंत्रज्ञ उपलब्ध झाले असते. आणि व्हेंटिलेटर अभावी दहा दिवसाच्या अंतराने दोघांना आपला जीव गमवावा लागला नसता. ह्या उपजिल्हा रुग्णालयास नव्याने निधी मंजुरी आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला राजकीय इच्छाशक्तीची ही जोड असावी लागणार आहे. सध्या मात्र तालुक्यातील नागरिकांनी सर्पदंश झाल्यास वेळ वाया न घालवता खाजगी दवाखान्यात अथवा परस्पर धुळे येथे उपचार घ्यावा अशी परिस्थिती आहे.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






