जळगाव प्रतिनिधी | अवकाळी पावसाच्या तडाक्यानंतर आता जिल्ह्यातील तापमानाचा temperature पारा वाढू लागला आहे. त्यात या आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असून हाेळीपर्यंत तापमान तब्बल 44 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कमाल तापमानात सतत वाढ हाेत आहे. शनिवारी 37-1 अंश तापमान नाेंदविले गेले. साेमवारपासून त्यात आणखी वाढ हाेण्याची शक्यता असून येत्या शुक्रवारपर्यंत पारा चाळीशी पार करून तब्बल 44 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
आठवडाभर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट असणार आहे. आठवड्यानंतर दाेन अंशानी तापमान कमी हाेवून 40 ते 42 अंशादरम्यान असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात गहू, हरभरा, बाजरी, सूर्यफूल, मका या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. आता आकाश निरभ्र आणि तापमान वाढणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.