भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात; मिळवला सर्वात मोठा विजय; कोहलीच्या शतकानंतर जडेजाने केला कहर

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विश्वचषकात भारतीय संघाची विजयी मोहीम सुरूच आहे. रविवारी (५ नोव्हेंबर) भारताने गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या विश्वचषकाच्या ३७व्या सामन्यात भारताने २४३ धावांनी विजय मिळवला. रवींद्र जडेजाने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. १२ नोव्हेंबर रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचा शेवटचा साखळी सामना नेदरलँडशी होणार आहे.

भारताने हा सामना २४३ धावांनी जिंकून मोठा विक्रम केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने २००३ मध्ये आफ्रिकन संघाचा १५३ धावांनी आणि २०१० मध्ये ग्वाल्हेरच्या मैदानावर १५३ धावांनी पराभव केला होता.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून ३२६ धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद १०१ धावा केल्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधले ४९ वे शतक झळकावत सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. श्रेयस अय्यरने ७७ आणि कर्णधार रोहितने ४० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्कराम वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ८३ धावा करू शकला. मार्को जॅनसेनने सर्वाधिक १४ धावा केल्या. त्याच्याशिवाय डुसेनने १३ आणि बावुमा-मिलरने प्रत्येकी ११ धावा केल्या. याशिवाय आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.

विराट कोहलीचे शानदार शतक आणि रवींद्र जडेजाच्या भेदक गोलंदाजीमुळे हा सामना लक्षात राहील. या विजयात संपूर्ण संघाचे योगदान महत्त्वाचे आहे, मात्र या दोघांनीही आपापली छाप सोडली. कोहलीने कठीण परिस्थितीत फलंदाजी करत विकेटवर नियंत्रण ठेवले. तो फलंदाजीला आला तेव्हा भारताची धावसंख्या ५.५ षटकांत एका विकेटवर ६२ धावा होती. शुभमन गिलही ११व्या षटकात बाद झाला. दोन विकेट पडल्यानंतर विराटला श्रेयस अय्यरची साथ लाभली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी केली. अय्यर ७७ धावा करून बाद झाला. फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर कोहली मध्यभागी बाद झाला असता तर टीम इंडिया अडचणीत आली असती.

कोहली संथ खेळत असल्याने सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा यांनी वेगवान धावा केल्या. विराटने सूर्यकुमारसोबत ३६ आणि रवींद्र जडेजासोबत ४१ धावांची भागीदारी केली. कोहली १०१ धावांवर नाबाद राहिला. रवींद्र जडेजाने नाबाद २९, शुभमन गिलने २३ आणि सूर्यकुमार यादवने २२ धावा केल्या. केएल राहुल केवळ ८ धावा करून बाद झाला.

भारतीय वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये संघाला एकदा यश मिळवून दिले. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात क्विंटन डी कॉकला (५) त्रिफळाचीत केले. यानंतर आफ्रिकन संघाच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या. मोहम्मद शमीने रॅसी व्हॅन डर डुसेन (१३) आणि एडन मार्कराम (९) यांना बाद केले. रवींद्र जडेजाने आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा (११), हेनरिक क्लासेन (१), डेव्हिड मिलर (११), केशव महाराज (७) आणि कागिसो रबाडा (६) यांना बाद केले. कुलदीप यादवने मार्को जॅनसेन (१४) आणि लुंगी एनगिडी (०) यांना बाद केले. तबरेझ शम्सी चार धावा करून नाबाद राहिला.

भारताने हा सामना जिंकून दोन गुण मिळवले. त्याचे आता आठ सामन्यांत १६ गुण झाले आहेत. गुणतक्त्यात अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरीत प्रवेश करेल. दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तानविरुद्ध एक सामना खेळायचा आहे. तो जिंकला तरी १४ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

विराटने यावर्षी आपले पाचवे शतक पूर्ण केले. विराटची ही १२१ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी होती, ज्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच विकेट्सवर ३२६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. आज शतक ठोकून कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या वाढदिवशी शतक झळकावणारा सातवा खेळाडू ठरला आहे. सचिनने ही कामगिरी वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी केली होती. तर विराटला ३५व्या वर्षी हे यश साधता आलं. त्याच्या आधी टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी ही कामगिरी केली आहे. आपले ४९ वे शतक झळकावून विराटने सचिनच्या सर्वाधिक ४९ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

केशव महाराजने १० षटकात एक विकेट घेतली. त्याने ३० धावा दिल्या, पण त्यात एकही चौकार नव्हता. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत चौकार न लावता १० षटकांचा कोटा पूर्ण करणारा तो सहावा खेळाडू आहे. याआधी मिचेल सँटनर, ग्लेन मॅक्सवेल, महिश तिक्शिना, राशिद खान आणि अॅडम झम्पा यांनी ही कामगिरी केली आहे. पण एकाही भारतीय गोलंदाजाला ही कामगिरी करता आली नाही.

रबाडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला सर्वाधिक वेळा बाद करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये मिळून १२ वेळा रोहितला बाद केले आहे. टीम साऊदीने ११ वेळा, अँजेलो मॅथ्यूज १० वेळा, नॅथन लायनने रोहितला ९ वेळा तर ट्रेंट बोल्टने रोहितला ८ वेळा बाद केले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार