विश्वचषकात भारताने पहिल्यांदाच सलग नऊ सामने जिंकले; नेदरलँडचा केला पराभव

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विश्वचषकाच्या साखळी फेरीतील ४५व्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडियाने चाहत्यांना विजयाची भेट दिली. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय खेळाडूंनी बॅट आणि बॉलने अद्भुत कामगिरी केली. या संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग नववा विजय मिळवला. २००३ च्या कामगिरीत त्याने सुधारणा केली आहे. त्यावेळी भारताने सलग आठ सामने जिंकले होते. विश्वचषकात सलग सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. २००२ मध्ये त्यांनी ११ सामने जिंकले होते.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ५० षटकांत चार विकेट गमावत ४१० धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ४७.४ षटकांत २५० धावांवर सर्वबाद झाला. सर्व नऊ सामने जिंकल्यानंतर भारताचे १८ गुण झाले आहेत. गट फेरीत त्याने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. तर, नेदरलँड्स तळाच्या १०व्या स्थानावर राहिला. त्यांनी नऊ सामन्यांत दोन विजय मिळवले. या पराभवानंतर नेदरलँड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

भारताने हा सामना जिंकला आणि २०२३ मध्ये २४ वा विजय मिळवला. त्याने एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताने यापूर्वी १९९८ मध्ये २४ सामने जिंकले होते. २०१३ मध्ये त्याने २२ सामने जिंकले होते.

भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद १२८ धावा केल्या. लोकेश राहुलने १०२ धावांची खेळी केली. कर्णधार रोहितने ६१ धावांची खेळी साकारत असतानाच ह्या विश्वचषकात ५०० धावांचा टप्पाही ओलांडला. विश्वचषक स्पर्धेच्या ४८ वर्षांच्या इतिहासामध्ये रोहित हा पहिला फलंदाज आहे ज्याने सलग दोन स्पर्धेमध्ये ५०० धावांचा टप्पा पार केला. त्याने २०१९ च्या स्पर्धेमध्ये ६४८ धावा काढल्या होत्या. गिल-कोहलीने प्रत्येकी ५१ धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली. विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने २००७ मध्ये बर्म्युडाविरुद्ध ४१३ धावा केल्या होत्या. राहुलने ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि हे विश्वचषकातील देशासाठी सर्वात वेगवान शतक ठरले. नेदरलँड्सकडून जस्ट डी लीडेने दोन बळी घेतले. मेकेरेन आणि मर्व्ह यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. रोहित शर्माने ११ पैकी नऊ खेळाडूंना गोलंदाजी दिली. केवळ केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी गोलंदाजी केली नाही. संघाचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. विराट कोहलीने २०१४ नंतर प्रथमच एकदिवसीय सामन्यात विकेट घेतली आहे. गेल्या वेळी त्याने वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ब्रेंडन मॅक्युलमला बाद केले होते. त्याला वनडेत पाचवे यश मिळाले आहे. विश्वचषकात त्याने प्रथमच विकेट घेतली आहे. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनाही गोलंदाजीची संधी मिळाली. भारताकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद शमीला या सामन्यात एकही यश मिळाले नाही. विश्वचषकात तिसऱ्यांदा एका संघाने नऊ गोलंदाजांचा वापर केला आहे. १९८७ मध्ये पहिल्यांदा पेशावरमध्ये श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडने नऊ खेळाडूंसह गोलंदाजी केली होती. त्यानंतर १९९२ मध्ये क्राइस्टचर्चमध्ये पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडने नऊ खेळाडूंना चेंडू दिला होता. आता ३१ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी केली आहे.

नेदरलँड्सकडून या सामन्यात केवळ एका खेळाडूने अर्धशतक झळकावले. तेजा निदामनुरूने सर्वाधिक ५४ धावा केल्या. सायब्रँडने ४५, कॉलिन अकरमन ३५ आणि मॅक्स ओडाडने ३० धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने १७ धावा केल्या. लोगान व्हॅन बीक आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे प्रत्येकी १६ धावा करून बाद झाले. बास डी लीडेने १२ धावा, आर्यन दत्तने पाच धावा आणि वेस्ली बॅरेसीने चार धावा केल्या. पॉल व्हॅन मीकरेन तीन धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहेत.

विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीचा पहिला सामना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकात्याचा इडन गार्डनमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार