जळगाव :- शहरालगत सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या सहाव्या दिवशी रविवारी (ता. १०) भक्तांनी ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी केली. शनिवारी रात्रीपासूनच लाखो भाविक कथास्थळी मुक्कामी आले.पोलिस विभागाच्या सूत्रानुसार रविवारी साडेसात लाख शिवभक्तांचा कुंभमेळा कथास्थळी भरला होता.पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा जळगाव शहरालगत कानळदा मार्गावर वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात ५ डिसेंबरपासून सुरू आहे. रविवारी कथेचा सहावा दिवस होता.रविवारमुळे लाखो भक्तांनी कथास्थळी हजेरी लावली.
त्यानुसार बहुसंख्य भाविक शनिवारी रात्रीच कथास्थळी मुक्कामी होते. रविवार असल्याने गर्दी होणार हे निश्चित होते. त्यामुळे भक्तांनी शनिवारी रात्रीच कथास्थळी मंडपात आपली जागा निश्चित केली होती. शनिवारी सायंकाळपासूनच जळगाव शहरातील विविध भागांतून तसेच बाहेरगावाहून येणारे भाविकही कथास्थळाकडे मिळेल त्या वाहनाने जात होते. रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्ते गजबजले होते. शनिवारी रात्री बारा ते एकच्या सुमारास जवळपास चार ते पाच लाख भक्तगण कथास्थळी डेरेदाखल झाले होते. रात्रभर मुक्कामी येणारे भाविक कथामंडपात जागा मिळेल त्याठिकाणी थांबले आहेत. अनेक जणांना मंडपात नव्हे, तर मैदानावर उघड्या जागेत झोपावे लागले. कडाक्याच्या थंडीतही नागरिक कथास्थळी थांबल्याचे दिसून आले. या थंडीत त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
भक्तांच्या सेवेत सेवेकरी
शनिवारी रात्रीच दाखल झालेले नव्हे, तर चार-पाच दिवसांपासून कथामंडपात थांबलेल्या भक्तांच्या सेवेसाठी सेवेकरी सज्ज आहेत.रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी विविध सेवा संस्था, संघटना तसेच व्यक्तिश; काही कुटुंबीय भक्तांना चहा, कॉफी, दूध, बिस्कीट, वेपर, नाश्ता, साबूदाणा खिचडी, भोजनाचे पाकीट पुरवत आहेत. आयोजकांच्या माध्यमातून दिवस-रात्र भट्टी सुरू असून, त्याठिकाणीही भोजनाची व्यवस्था आहे. शनिवारी रात्रभर ही सेवा अविरत सुरू होती. लाखो भक्तगण असूनही कुणाला चहा, कॉफीची कमतरता जाणवली नाही.
सकाळपासून पुन्हा गर्दी
कथास्थळी जाण्यासाठी रविवारी सकाळपासून पुन्हा गर्दी झाली. कथास्थळाकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर गर्दी दिसत होती. राज्य परिवहन महामंडळाने भक्तांच्या सुविधेसाठी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, तीही अपुरी पडत आहे. रविवारी पहाटेपासूनच प्रवासी वाहने, तसेच मालवाहू वाहनांमधून भक्त कथास्थळाकडे जात होते.
भजन-कीर्तनाने रात्रीचा केला दिवस
कडाक्याच्या थंडीतही रात्र जागून काढावी लागत असली तरी भक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. स्वत: पंडित मिश्रा यांनी त्यांच्या रविवारच्या निरूपणात जळगावकरांच्या या उत्साहाचे कौतुक केले. रात्रभर कथास्थळावर भजन, कीर्तन सुरू असते. डीजे, ढोल-ताशे, नगारेंचा गजर असतो. भक्तांच्या चेहऱ्यावर चैतन्यदायी आनंद असतो. या लाखोंच्या गर्दीत सेवेकरी भक्तांना चहा, कॉफी, दूध, नाश्ता पुरविताना थकताना दिसत नाही. शिवभक्ती करणाऱ्या या सर्व घटकांनी कथेच्या सहाही रात्रींचा दिवस केल्याचे चित्र दिसून आले.
शिवमहापुराण कथास्थळी ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप
वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी मंदिर परिसरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्याद्वारे शिवमहापुराण कथा सुरू आहे. शिवपुराण ऐकण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशासह संपूर्ण भारतातून लाखो भाविक कथेचा लाभ घेत आहेत. या कथेसाठी येणाऱ्या भाविकांची भोजनाची गैरसोय होऊ नये यासाठी ‘स्नेहाची शिदोरी’ देण्यात येत आहे.
५ ते ११ डिसेंबरदरम्यान कथास्थळी भवरलाल अॅन्ड कांताबाई जैन फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्यातर्फे रोज ११ हजार ५०० ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप करण्यात येत आहे. याचा एकूण ८० हजार ५०० भाविकांनी लाभ घेतला. भाविकांसह परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांनाही ही शिदोरी दिली जात आहे.’स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम कोरोनाकाळात सुरू करण्यात आला. जळगाव शहरात कुणीही उपाशी राहू नये हा ध्यास भवरलाल जैन यांचा होता आणि याची पूर्तता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी डिसेंबर २०२० पासून ही ‘स्नेहाची शिदोरी’ अविरत सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानुसार ही शिदोरी सुरू आहे. कांताई सभागृहात आताही दिवसाला एक हजार ४०० पाकिटे वाटप केली जातात. आतापर्यंत २३ लाख १३ हजार ७९ आवश्यकता असणाऱ्यांना शिदोरी वाटप करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.