64 वर्षाच्या विधवा महिलेचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार;प्रायव्हेट पार्टवर वार,निर्जन ठिकाणी विवस्त्र सोडून नराधमांनी काढला पळ.

Spread the love

मुंबई :- गँगरेपचं एक गंभीर प्रकरण उघडकीस आलं आहे. दोन ते तीन तरुणांनी एका वृद्ध विधवा महिलेवर बलात्कार करून तिला बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ईशान्य मुंबईतील ट्रॉम्बे येथे दोन ते तीन तरुणांनी 64 वर्षाच्या विधवा महिलेचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला तसेच तिला बेदम मारहाण केली,

अशी माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली.पीडित महिलेच्या मुलीने नोंदवलेल्या तक्रारीत तिने म्हटलंय, “माझी आई सोमवारी रात्री कुर्ल्यातील नेहरुनगर परिसराच्या जवळ असलेल्या श्री खंडोबा मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती.“तिथून किमान तीन जणांनी तिचा पाठलाग करून तिचं अपहरण केलं आणि ट्रॉम्बे येथील ठाणे खाडीजवळील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला, असं सांगितलं जात आहे. गुन्हेगारांनी पीडित महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, प्रायव्हेट पार्टवर तसेच शरीराच्या इतर अवयवांवर हातोड्यानं वार केले.

त्यामुळे ती निर्जन खाडी परिसरातच बेशुद्ध पडली. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता.मुलीच्या तक्रारीनुसार, तिन्ही गुन्हेगारांनी अंधाराचा फायदा घेत तिचा मृत्यू झाल्याचं समजून घटनास्थळावरून पळ काढला. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक महिलेनं विवस्त्र असलेल्या आणि रक्तस्राव होत असलेल्या पीडित महिलेला मदतीची याचना करताना पाहिले.पीडित महिलेच्या रडत असलेल्या मुलीने मंगळवारी रात्री उशिरा एजन्सीला सांगितलं की, “त्या दयाळू महिलेनं सर्वप्रथम पीडितेला घालण्यासाठी गाऊन दिला. त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ट्रॉम्बे पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, “पीडितेला तातडीने घाटकोपर येथील बीएमसीच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिचे सीटी स्कॅन केले जाईल.““या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या साथीदारांविषयी चौकशी केली जात आहे. पीडित महिला तिची मुलगी आणि नऊ वर्षाच्या नातवासोबत राहते. स्थानिक बाजारपेठेत मासे आणि झाडू विकून ती आपला उदरनिर्वाह करते,“ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार