जळगाव :- गुजरातच्या सुरती टोळीतील भामट्यांनी कट आखून जळगावच्या तब्बल सात डाळ उद्योजकांची ४५ लाख ६६ हजार ८८८ रुपयांची फसवणूक करून डाळींचा तयार माल फस्त केला होता. डाळ उद्योजक रमेशचंद्र जाजू यांच्या तक्रारीवरून तीन वर्षांपूर्वी (२७ डिसेंबर २०२०) दाखल गुन्ह्यात सुरत येथून मुकेश देवशीभाई कथोरोटिया (वय ५२, रा.सुरत) याला अटक केली असून, तो जळगावच्या डाळ उद्योगाची लूट करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली
‘एमआयडीसी’तील डाळउद्योजक जाजू यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून एप्रिल २०२१ मध्ये नीलेश सुदाणी (वय ३९) याला अटक केली होती. अटकेनंतर दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत सुदाणी याने गुन्ह्याची कबुली देत माहिती दिली.त्याचप्रमाणे या गुन्ह्यात तो एकटाच नसून, व्यापारी उद्योजकांना ठगणारी संपूर्ण सुरती टोळीच कार्यरत असल्याचे त्याने सांगितले. त्या सर्व संशयितांचे खरे नाव, पत्ते सुदाणी याने तेव्हाच एमआयडीसी पोलिसांना दिले होते. दोन वर्षांपासून संशयितांचा शोध सुरू होता. एमआयडीसी पोलिसांनी तब्बल चार वेळेस सुरत गाठून या संशयिताचा शोध घेतला.
मात्र, पोलिस आल्याचा सुगावा त्याला मिळत असल्याने तो पसार होत असे. या वेळी मात्र निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवींद्र चौधरी, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, अश्पाक शेख अशांच्या पथकाने गुजरात- सुरत येथे धडकत मुकेश कथोरोटिया यास अटक करून जळगावी आणले. संशयिताला शनिवारी (ता. २३) न्यायालयात हजर केले असता न्या. आर. वाय. खंडारे यांच्या न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अटकेतील मुकेश याने जळगावसह महाराष्ट्रातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला असून, त्याच्या टोळीतील संशयितांना यापूर्वीच अटक झाली आहे. तपासात इतरांची नावे समोर आल्यावर त्यांनाही अटक करण्यात येईल.
या व्यापाऱ्यांना लावला चुना
रमेशचंद्र जाजू (१६ लाख ८९ हजार ९५०), सिद्धार्थ जैन (दोन लाख ६३ हजार ९७०), सत्यनारायण बाल्दी (दोन लाख ३७ हजार), दिनेश राठी (नऊ लाख ३६ हजार ९०), पुष्पक मणियार (एक लाख ३१ हजार १५), अविनाश कक्कड (दोन लाख ७० हजार) व किशोरचंद भंडारी (दहा लाख ३८ हजार ८६३ रुपये).पाच संशयित निष्पन्नअटकेतील नीलेशने दिलेल्या माहितीनुसार फसवणूक करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्धरीत्या प्लॅन करून अंजिठा चौकातील हॉटेल महिंद्र येथे बनावट ओळखपत्र दाखवून खोली ‘बुक’ केली होती. एकामागून एक उद्योजकांना वेगवेगळ्या नावाने संपर्क करून लाखो रुपयांना गंडविण्यात आले.अटकेतील संशयित नीलेश वल्लभदास सुदाणी याच्यासह मुकेश कथोरोटिया (रा. सुरत), केतन कपुरिया (राजकोट, सुरत), अरविंद क्वाडा आणि ऋषी देसाई अशा एकूण पाच संशयितांची नावे समोर आली आहेत.