बोदवड : कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड (ता.बोदवड) येथे घरी जाताना धावत्या रिक्षेतून तोल गेल्याने अकरावी मधील १७ वर्षीय विद्यार्थिनी खाली पडली. या अपघातात तिच्या मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर जळगावला नेताना तिचा रस्त्यात मृत्यू झाला. तृप्ती भगवान चौधरी असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली.
काय आहे घटना?
तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न.ह.रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेला आहे. कॉलेजची वेळ सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे गुरुवारी शिक्षणासाठी आली. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड येथे घरी आॅटोरिक्षाने निघाली. यावेळी ती पॅजिओ रिक्षाच्या पुढील सीटवर मैत्रिणीसोबत बाहेरील साइडने बसली होती.
बोदवडपासून दोन किमी अंतरावर अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रीण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रिक्षातून खाली पडल्या. तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या दवाखान्यात नेण्यात आले.
पण, प्रकृती गंभीर असल्याने जळगावला नेताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला. जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. यानंतर तृप्तीवर दुपारी ४ वाजता शेलवड येथे अंत्यसंस्कार झाले.