परवडणारे वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे – राज्यपाल

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सध्या युक्रेनमधून वैद्यकीय शिक्षणाअभावी विद्यार्थी महाराष्ट्रात परतले आहे तसेच मोठ्या संख्येने इथले विद्यार्थी देखील वैद्यकीय शिक्षण घेत आहेत, अशा परिस्थितीत परवडणारे वैद्यकीय शिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी पर्यायी मार्ग अवलंबण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे विचार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. माध्यम सल्लागार रवि नायर यांनी या विषयावर त्यांची भेट घेऊन याबाबतचे एक निवेदन सादर केले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील वैद्यकीय शिक्षणासाठी असलेल्या विद्यमान जागा, अवास्तव कॅपिटेशन फी अशी अनेक आव्हाने हे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील १२ हजारांहून अधिक खासगी रुग्णालयाची क्षमता ३६ जिल्हे आणि ४५ शहरांसाठी अपूरी आहे. महाविद्यालयांची संख्या कमी असल्यामुळे या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात सहभागी करून तिथे प्रशिक्षण दिले जावे, त्याचबरोबर त्यांना काही काळ त्याच ठिकाणी सेवा देणे बंधनकार करावे, सकाळी ८ ते ११ या वेळेत विद्यार्थी अनिवार्यपणे लेक्चर्सला उपस्थित राहतील आणि पुढे सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत पीजी स्टूडंट ओटी, क्लिनिकल, बेडसाइड, हिस्ट्री घेणे, वॉर्ड व्हिजिट अशा आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी उपस्थित राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्यांच्या परिसरातच अभ्यासक्रम होईल. अतिरिक्त महाविद्यालयांची गरज भासणार नाही. त्याला वसतिगृहात राहण्याची किंवा भाड्याच्या घरासाठी जास्त भाडे देण्याची गरज नाही. त्यामुळे अतिरिक्त खर्चाची बचत होणार आहे, अशा स्वरुपाचे उपाय या निवेदनात रवि नायर यांनी सुचवले आहेत.

टीम झुंजार