मुंबई : मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली. यानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमदारांना ही घरे मोफत दिली जाणार नसून त्यांच्याकडून पैसे घेण्यात येणार आहेत, असा खुलासा आव्हाड यांनी ट्विट करत केला आहे.
आमदारांना घरे मोफत देणार नाहीच, तर…!
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत दिली आहे.
दरम्यान, आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावर सोशल मीडियात सर्वसामान्य नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत असताना लोकप्रतिनिधींनीही या निर्णयावर भाष्य केलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला होता. तसंच सत्ताधारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आपण या निर्णयाबाबत असहमत असल्याचं सांगितलं होतं.