भाजपा आमदारांनी शिवसेना शिंदे गटाचे मा. नगरसेवक यांच्यावर पोलीस ठाण्यातच केला गोळीबार,आमदाराचा गोळीबार CCTV मध्ये कैद

Spread the love

नेमका वाद काय?, पोलीस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर.

कल्याण: कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर स्वत: बंदुकीतून गोळ्या झाडल्याची घटना काल (2 फेब्रुवारी) रात्री उशिरा उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच हा सगळा भयंकर प्रकार घडला आहे. आता या सगळ्या घटनेचं नेमकं सीसीटीव्ही फुटेजच समोर आलं आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं हे आता समोर आलं आहे.

भाजप आमदाराकडून गोळीबार, सीसीटीव्ही फुटेज समोर

उल्हासनगर मधील गोळीबार प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने नेमकं त्यावेळी काय घडलं हे आता समोर आलं आहे. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजची जी दृश्य समोर आली आहेत त्यात असं दिसून येत आहे की, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात त्यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि शिवसेना नेते राहुल पाटील असे बसले होते. बराच वेळ या लोकांमध्ये काही बोलणी सुरू होती. पण नंतर काही काळ त्या दालनात काहीच घडत नव्हतं..

पण अचानक आमदार गणपत गायकवाड हे आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी थेट महेश गायकवाड यांच्या दिशेने आपल्या बंदुकीतून 4 गोळ्या झाडल्या. यावेळी जीव वाचविण्यासाठी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांनी दालनातून बाहेर पळायला सुरुवात केली गणपत गायकवाड यांनी दोन गोळ्या राहुल पाटीलच्या दिशेनेही झाडल्या. याचवेळी गोळी लागल्याने महेश गायकवाड हे दालनातच खाली कोसळले. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडच्या दिशेने झेप घेत त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहारही केला. त्यानंतर हा सगळा गोंधळ पाहून पोलीस अधिकारी, गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड या दोघांचेही कार्यकर्ते हे दालनात शिरले. यावेळी त्यांच्यातही तुफान हाणामारी झाली. आता ही सर्व दृश्य सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहेत. ज्यावरून या घटनेची तीव्रता आपल्या लक्षात येईल.

नेमका वाद काय?

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. यामुळे काल (2 फेब्रुवारी) दोघांनीही आपल्या समर्थकांसह हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस ठाण्यात त्यांच्यात सुरुवातीला काही शाब्दिक चकमक उडाली. ज्यानंतर गणपत गायकवाड यांनी अचानक महेश गायकवाडांवर 4 गोळ्या झाडल्या. यावेळी शिवसेनेचे राहुल पाटील यांनाही गोळी लागली.महेश गायकवाडांच्या पोटात आणि इतर ठिकाणी चार गोळ्या लागल्या.

पोलीस नेमकं काय म्हणाले?

गोळीबाराच्या या घटनेबाबत डीसीपी सुधाकर पठारे म्हणाले, ‘महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्याचवेळी दोघांमध्ये वादावादी होऊन गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला. यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. तपास सुरू आहे.

‘ही’ दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात

टीम झुंजार