प्रेम प्रकरण उघडकीस आल्यामुळे कुटुंबातीलच लोकांनीच प्रियकर आणि प्रेयसीची निर्दयी हत्या केल्याच्या घटना आजवर आपण ऐकल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. या ठिकाणी एका भावानेच आपल्या बहिणीची हत्या केली आहे. तसेच तिच्या प्रियकराचा शिरच्छेद करत आईवर देखील हल्ला केला आहे. ही सर्व घटना मंगळवारी रात्री मदुराईतील तिरुमंगलमजवळ घडली आहे. सध्या या घटनेने संपूर्ण तामिळनाडूमध्ये खळबळ उडवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीणकुमार (वय 22) याची बहिण महालक्ष्मी (वय 25) ही सतीशकुमार नावाच्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या चार वर्षांपूर्वी महालक्ष्मीने एका दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले होते. मात्र हे लग्न टिकले नाही. त्यामुळे या दोघांचा घटस्फोट झाला. त्यामुळे सध्या ती आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. मधल्या काळात तिची सतीशकुमारसोबत मैत्री वाढली आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले.मात्र दुसरीकडे महालक्ष्मीच्या लहान भावाला म्हणजेच आरोपी प्रवीणकुमार याला या दोघांचे रिलेशनशिप मान्य नव्हते. त्याने महालक्ष्मीला तशी ताकीद देखील केली होती.
परंतु तरीदेखील तिने रिलेशनशिप संपवले नाही. अखेर मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रवीण कुमारने सतीश कुमारला कामावरून घरी परतत असताना बेदम मारहाण केली. इतकेच करून न थांबता आरोपीने सतीशकुमारीचे शीर धडावेगळे केले. यानंतर त्याने सतीश कुमारचे शीर थिएटर स्टेज इमारतीत ठेवले. पुढे आरोपी घरी आला आणि त्याने आपल्या बहिणीचा गळा धारदार शस्त्राने चिरला.
यावेळी आरोपीची आई मुलीला वाचवण्यासाठी मध्ये आली असता त्याने आईच्या देखील हातावर वार केले.या हल्ल्यामध्ये महालक्ष्मीच्या जागीच मृत्यू झाला. मुख्य म्हणजे, दोन व्यक्तींची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर या सर्व घटनेप्रकरणी सतीश कुमारच्या भावाने कुडाकोविल पोलिसात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावरच पोलिसांनी प्रवीण कुमारला अटक केली आहे.