काळीज पिळवटून टाकणारी घटना! ‘दारु सोड नाही तर बाळाचा जीव घेईन….,नवऱ्याला धमकवण्याच्या नादात बायकोचं भयंकर कृत्य

Spread the love

अंबिकापूर : छत्तीसगड राज्यातल्या अंबिकापूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. स्वतःच्या आठ महिन्यांच्या बालकाची हत्या करून एक महिला फरार झाली. तिने चाकूच्या साह्याने आपल्या बालकाची हत्या केली. फरार झाल्यानंतरतिनेआत्महत्या केल्याचं आता उघड झालं आहे. तिचा मृतदेह तलावात तरंगत असल्याचं आढळलं. सकरिया गावातल्या तलावात तिचा मृतदेह आढळला. पोलीस या महिलेचा गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होते. पतीच्या मद्यपानाच्या सवयीमुळे ही महिला नाराज होती. तिने पतीला अशी धमकीही दिली होती, की त्याने मद्यपानाचं व्यसन सोडलं नाही, तर ती मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या करील. तिने ती धमकी खरी करून दाखवली आहे. पोलिसांनी तिच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करवून घेतलं आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

एमकुन्नी चौकी पोलीस ठाण्यात 26 जानेवारीला अशी माहिती देण्यात आली, की कोणी तरी आठ महिन्यांच्या निरागस बालकाची हत्या केली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी तपास सुरू केला. तपासात असं निष्पन्न झालं, की आईनेच आपल्या मुलग्याची चाकूने हत्या केली आहे आणि ती फरार झाली आहे. पोलीस तपासात असं आढळलं, की आरोपी महिलेचा पती पवन चौहान याला मद्याचं व्यसन होतं.

दररोज मद्यपान करून तो पत्नीशी भांडायचा. 25 जानेवारीच्या रात्रीही तो मद्यपान करून घरी आला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये मोठं भांडण झालं.त्या वेळी पत्नीने पतीला धमकी दिली होती, की बाळाची हत्या करून ती स्वतः आत्महत्या करील. नशेत असलेल्या पतीने त्याकडे दुर्लक्ष केलं. पती सकाळी उठला, तेव्हा आठ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह त्याच्यासमोर पडलेला होता आणि पत्नी घरात नव्हती. ती पळून गेली होती. त्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला, आरडाओरडा झाला. या घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. बालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टेमला पाठवला आणि त्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

त्यानंतर पोलीस त्या बालकाच्या आईचा शोध घेऊ लागले. सहा दिवसांनी पोलिसांना एक खबर मिळाली, की एका महिलेचा मृतदेह सकरिया गावाच्या तलावात तरंगत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर असं स्पष्ट झालं, की बालकाच्या हत्येप्रकरणी पोलीस ज्या महिलेचा शोध घेत होते, तीच ही आरोपी आई आहे. पोलीस आता पोस्ट-मॉर्टेम रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत. पोस्ट-मॉर्टेम झाल्यावर महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

टीम झुंजार