मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “कोकण मराठी साहित्य परिषद हे ३१ वर्षांपूर्वी मी रोपटे लावले होते, खरे तर ते मी लावले नाही, तर साहित्य शारदेनेच ते माझ्याकडून लावून घेतले असावे, आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून त्याच्या सावलीत असंख्य कवी, कवयित्री, लेखक कार्यरत आहेत, हे माझे भाग्यच आहे”, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३१ वा वर्धापन दिन वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीच्या सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, नॅशनल लायब्ररीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांच्यासह प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक अशोक बेंडखळे, कोमसापच्या मुंबई जिल्हा अध्यक्षा लता गुठे, पंकज दळवी, मनोज वराडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या की, आजचा दिवस कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी खूपच आनंदाचा आहे. तुम्ही काम केले तर तुमच्या गुणवत्तेची नोंद घेतली जात असते, हे या संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाने अनुभवले आहे. साहित्यिक संस्थेत वाद नव्हे, तर संवाद असावेत, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी कोमसापचे संस्थापक-अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा वक्त्यांनी आढावा घेतला. कोमसापच्या मुंबई जिल्हा अध्यक्षा लता गुठे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या कवितांचा मागोवा घेतला. मधुभाई म्हणजे पाय जमिनीवर रोवून आकाश कवेत घेणारा साहित्यिक आहे. मधुभाईंचा ‘शब्दांनो मागुते’ या हा एकच कविता संग्रह प्रकाशित आहे, असे सांगून या कविता संग्रहाची लवकरच दुसरी आवृत्ती निघेल, असे सांगितले.
अशोक बेंडखळे यांनी मधुभाईंच्या ‘माहीमची खाडी’ आणि ‘संधीकाल’ या दोन कादंबऱ्यांचा यावेळी वेध घेतला. ‘माहीमची खाडी’ ही झोपडपट्टीतील जीवनाचे वाचकांना दर्शन घडवते, तर ‘संधीकाल’ ही कादंबरी मुंबईतील बदलत्या जीवनाचा वेध घेणारी आहे, असे त्यांनी सांगितले.
कोमसाप बांद्रा शाखेचे कार्याध्यक्ष पंकज दळवी यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘गणपतीची शाळा’ या लेखाचे या वेळी वाचन केले, तर गिरगाव शाखेचे अध्यक्ष मनोज वराडे यांनी ‘मालवणी माणूस’ या कथेचे वाचन केले. चारही वक्त्यांनी यावेळी मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचे मनोज्ञ दर्शन उपस्थितांना घडवले.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुष्पा कोल्हे यांनी ईशस्तवन सादर केले. कोमसाप मुंबईचे कार्यवाह डॉ. सुनील सावंत यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन मृण्मयी भजक यांनी तर आभार प्रदर्शन कोमसाप मुंबई शाखेचे कार्याध्यक्ष डॉ. कृष्णा नाईक यांनी केले.