जेईईत कमी गुण मिळाल्याने धक्का सहन न झाल्याने नैराश्यातून जळगावात तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; संपवलं जीवन.

Spread the love

जळगाव :- जेईई परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. जळगावातील एका विद्यार्थ्याला कमी गुण मिळाल्याने हा धक्का सहन न झाल्याने त्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यश गणेश खर्च (१८, रा. जोशीवाडा, मेहरूण) असे गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि १४) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशने मंगळवारी रात्री कुटुंबीयांसह जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावर गेला. बुधवारी सकाळी त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली. मात्र, त्याने दरवाजा उघडला नाही. बराच वेळ आवाज दिला तरी आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी यशने गळफास घेण्याचे आढळले. त्याला कुटुंबीयांनी तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला. त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला.

एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यश हा जळगाव शहरातील जोशीवाडा परिसरात त्याच्या आई-वडिलांसह राहत होता. तो मेहरूणमधील राज विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याने जेईई परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल हा मंगळवारी (दि १३) जाहीर झाला. या परीक्षेत यशला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो निराश झाला होता. या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याचे मामा महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

हे पण वाचा

टीम झुंजार