राजकारण गेलं चुलीत, पण..; मुख्यमंत्र्यांवर फडणवीसांचा घणाघात

Spread the love

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झाला असला तरी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टीकेच्या तोफा डागण्याची मोहीम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरूच ठेवली आहे. ‘राजकारण गेलं चुलीत. मात्र, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे. पण त्याला बट्टा लागतोय. ही अवस्था महाराष्ट्रानं कधीही पाहिली नव्हती,’ अशी घणाघात टीका फडणवीस यांनी केलीय.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला उभ्या महाराष्ट्राने पाहिला. मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर झालेल्या प्रत्येक आरोपाचे सडेतोड उत्तर दिले. कोविड घोटाळ्याच्या आरोपापासून ते नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यापर्यंत त्यांनी रोखठोक भूमिका मांडत विरोधकांना जोरदार फटकारेही लगावले. त्यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणापासूनच सुरुवात करत कोपरखळ्या, टोले, चिमटे काढत विरोधकांना उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेच होते, पण आता त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.

ते म्हणाले, ‘राज्यात जे काही सुरू आहे, त्यासंबंधी सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता मला राजकारणापेक्षा महाराष्ट्राची जास्त चिंता आहे. राज्यात सध्या ‘नो गव्हर्नन्स’ अशीच अवस्था पहायला मिळत आहे. अशी अवस्था राज्यानं कधीही पाहिली नव्हती. राजकारण जाईल चुलीत. महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे. येथील गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे, त्याला कुठेही बट्टा लागता काम नये, याची खरी काळजी करण्याची गरज आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.

टीम झुंजार