रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी पिठाच्या गोळ्यात स्फोटक पदार्थांच्या वापर, कुत्र्याने गोळ्यावर मारला ताव अन् झाला स्फोट.

Spread the love

प्रतिनिधी | अमळनेर

रानडुकरांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्बचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे आढळून आला. शेत रस्त्यावर पिठाच्या गोळ्यात स्फोटक पदार्थ भरले होते. तो खाण्यासाठी एका कुत्र्याने त्यावर ताव मारताच स्फोट झाला. त्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नंतर आणखी दोनदा स्फोट झाले. त्यात एक ट्रॅक्टर त्यावरुन गेले. आणि एका ठेलाऱ्याने त्या गोळ्यावर काठी मारल्यावर स्फोट झाला. या परिसरात आठ ते दहा गोळे आढळून आले अाहे.

मांडळ येथील काही महिला शेतीचे काम आटोपून दुपारी चार वाजेच्या सुमारास घराकडे येत होत्या. त्याचवेळी रस्त्यावर पडलेला कणकेचा गोळा पाहून कुत्रा त्यावर ताव मारण्यासाठी गेला. मात्र, त्याचवेळी स्फोट होऊन कुत्रा जागीच ठार झाला. ही घटना पाहून त्या महिला भयभीत झाल्या. त्यांनी ही बाब गावात सांगताच एपीआय शीतलकुमार नाईक यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सहा ते आठ गोळे थोड्या थोड्या अंतरावर ठेवल्याचे दिसून आले. त्यांची तपासणी केल्यावर त्यात स्फोटक पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पोलिस घटनास्थळी थांबून आहे.
कमी क्षमतेचे होते स्फोटके…

अमळनेर येथील बाॅम्बस्फाेटासह सापडलेले बाॅम्ब निकामी करण्यासाठी जळगावातून बीडीएस (बाॅम्ब डिस्पाेझल स्काॅड) घटनास्थळी पाेहाेचल्यानंतर या पथकाने शेतात येणारे जंगली प्राणी राेखण्यासाठी वापरले जाणारे आपटी बाॅम्ब तपासले आहेत. ते कमी क्षमतेचे असल्याचे जळगाव अप्पर पाेलिस अधीक्षकांचा पदभार असलेल्या चाळीसगाव विभागाच्या अप्पर पाेलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी ही शक्कल लढवल्याचा अंदाज…
पोलिसांनी स्थानिक चौकशी करून शेती पिकांची नासधूस करून नुकसान करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी ही शक्कल लढवली असावी, असा कयास अाहे. मात्र, पोलिस याचा तपास करत अाहे, असे शितलकुमार नाईक यांनी सांगितले

टीम झुंजार