ऐन तारुण्यात वैधव्य आलेल्या”अर्चना”ला अविवाहित नारायणाने लग्न करून फुलविली संसाराची वेल

Spread the love

दोन्ही मुलांचे पालकत्वही स्वीकारून आयुष्यभरासाठी दिली पितृछत्राची सावली, कळमसरे येथील माळी समाजाचा आदर्श विवाह सोहळा

अमळनेर l प्रतिनिधी

अमळनेर :- तालुक्यातील पाडळसरे येथून जवळच असलेल्या कळमसरे येथील “अर्चनाच्या” जीवनात दोन मुलं होऊन ऐन तारुण्यात वैधव्य आलेल्या महिलेशी अविवाहित “नारायणाने” लग्न करून तिच्या दोन्ही पाल्यांना पितृछत्र देणाऱ्या नारायण गुलाब पाटील (माळी) या अविवाहित तरुणाने माळी समाजात एक नवीन आदर्श पायंडा निर्माण केला आहे.त्यामुळे या आदर्श विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

कळमसरे येथील निवृत्त वायरमन पौलाद शंकर वैराळे (माळी) यांची मुलगी अर्चना (४०) हिचा २० वर्षांपूर्वी आडगाव, ता. एरंडोल येथील राजेंद्र महाजन यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मोलमजुरीने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू असताना कोरोना काळात बेरोजगारीमुळे अर्चना, पती व मुलांसह माहेरी राहायला आली. मोठी मुलगी वंशिका हिचा कर्करोगाने तीन वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. या दुःखातून सावरत नाही, तोच वर्षभरापूर्वी पती राजेंद्र महाजन हेही दगावले. अर्चनाने स्वतःला सावरत मुलगा कृष्णा (दहावी) व मुलगी माधुरी (सातवी) यांच्या शिक्षणासाठी कंबर कसली. बचत गटातून कर्तृत्ववान महिला म्हणून ग्रामपंचायतीने तिचा नुकताच सत्कार केला होता.

इकडे नारायणचे वडील हभप गुलाब पाटील (महाजन ) यांचे किरकोळ अपघातात निधन झाले तर, पंधराच दिवसांपूर्वी त्याच्या आईचे अकस्मात निधन झाले. एक विवाहित बहीण सासरी असल्याने नारायण एकटा होता. निराधार अवस्थेत खाजगी वाहनचालक म्हणून मिळेल तेथे काम करून नारायण आपला उदरनिर्वाह करू लागला. तशातच मित्र मंडळींच्या माध्यमातून कष्टाळू व प्रामाणिक नारायण व होतकरू अर्चनाच्या पुनर्विवाहाचा विषय पुढे आला आणि अर्चनाने ही होकार दिल्याने नुकताच तापी पांझरा संगमावरील श्रीक्षेत्र कपिलेश्वर तीर्थक्षेत्री नारायण व अर्चनाचा ग्रामस्थ, मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत विधिवत विवाह सोहळा संपन्न झाला

यावेळी नारायणचे चुलतभाऊ भागवत माळी व रवींद्र माळी ,उपसरपंच जितेंद्र राजपूत ,अंबालाल राजपूत , ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील ,ग्रामपंचायत सदस्य तुकाराम महाजन ,मनोज चौधरी व वधु अर्चनाचे चुलतभाऊ डॉक्टर रामचंद्र पाटील ,दीपक पाटील आदींची उपस्थिती होती ,या विवाह सोहळ्यामुळे कृष्णा व माधुरी या मुलांना पितृछत्र मिळाले , माळी समाजातील या आदर्श विवाहाचे सर्व स्थरारातु कौतुक होत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार