परिसरात एकच खळबळ !
नाशिकमध्ये बंद गाळ्यात केमिकलने माखलेले आढळले मानवी अवयव

Spread the love

नाशिक : नाशिकमधील ह्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  इथल्या एका बंद दुकानात मानवी शारीराचे काही अवयव सापडल्याने परिसरातिल नागरिकान मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईनाका पोलीस स्टेशन जवळील गाळ्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. रासायनिक द्रव्यामध्ये हे मानवी अवयव आढळले आहेत. एकूण ८ कान, मेंदू, डोळे, चेहऱ्याचा भाग आढळून आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

परिसरातील नागरिकांना कुजलेला वास आल्याने तसेच गाड्यांमधील बॅटरीच्या चोरीच्या घटना वाढल्याने त्याचा शोध घेत असताना गाळ्यात मानवी अवयव आढळून आले. रविवारी रात्री हा प्रकार समोर आला. 2005 पासूनचे अवयव असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून दुकान उघडले नसल्याचा दावा गाळा मालकाने केला आहे.  वैद्यकीय शिक्षण घेणारे तरुण या गाळ्याचा वापर करत होते. वैद्यकीय अभ्यासासाठी अवयवांचा उपयोग केल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. संबंधितांचे जबाब नोंदवून पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले, “मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीतील हरीविलास सोसायटीमधील बँकेचे निवृत्त कर्मचारी शुभांगिनी शिंदे यांचे 20 आणि 21 असे दोन गाळे आहेत. त्यापैकी 20 नंबरचा गाळा बऱ्याच वर्षांपासून बंद होता. इथल्या नागरिकांना कुजलेला वास येत होता. शिवाय इथे गाड्यांमधील बॅटरी चोरीचे प्रकारही घडत होते, त्या बॅटरी इथे ठेवलेल्या आहेत का याचा तपास सुरु होता. यावेळी गाळा उघडला असता तिथे दोन बकेटमध्ये मानवी शरीराचे भाग ठेवलेले दिसले.

प्राथमिक अंदाजानुसार, शुभांगिनी शिंदे यांची दोन मुले वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. एका मुलगा डेंटिस्ट तर दुसरा मुलगा ईएनटी स्पेशलिस्ट आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेत असताना कदाचित त्यांनी किंवा त्यांच्या मित्रांनी अभ्यासासाठी बॉडी पार्ट आहे का याचा तपास सुरु आहे. कारण ते अवयव ठेवण्याची पद्धत, वापरलेलं रसायन हे एक्स्पर्ट किंवा त्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तीलाच माहित असू शकते. बकेटमध्ये एकूण आठ कान आढळून आले आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी हे अवयव ठेवले असावेत अशी शक्यता दाट आहे. तरी देखील मुंबई नाका पोलीस स्टेशन, नाशिक पोलिसांचा गुन्हे शाखा विभाग पुढील तपास करत आहे. लवकरच अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू. कंटेनरवर 2005 हे वर्ष दिसून येत आहे. त्यामुळे ते जर गृहित धरल तर मागील 16-17 वर्षांपासून अवयव तिथे असल्याचे दिसून येतं.”

दरम्यान पोलिसांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे. “एक मृतदेह असता तर आम्ही घातपाताचा संशय व्यक्त केला असता. पण एकूण आठ कान असून ते व्यवस्थितरित्या कापल्याने हे काम एखादा स्पेशालिस्ट किंवा त्या क्षेत्रातील व्यक्तीच करु शकतो आणि त्याच्यासाठी ते रोजचंच काम असतं. त्यामुळे ते अवयव अभ्यासासाठी ठेवले असावेत हे प्रथमदर्शनी म्हणू शकतो. तरी देखील सखोल तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत,” असे पोलीस आयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी स्पष्ट केले.

टीम झुंजार