अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या जबड्यात पतीचे डोके अडकलेले असतानाही घाबरुन व जाता वाघाशी दोन हात करत झुंज देत पत्नीने त्याला ठोसे लगावून पळऊन लावले आणि पतीला नवीन जन्म दिला असे म्हटले तरी चालेल. पारनेर तालुक्यातील दरोडी चापळदरा इथे सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. पत्नीच्या या धाडसाने एका पतीचे प्राण वाचले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.बिबट्याच्या जबड्यात पतीचे डोके पकडले होते. पती मृत्यूचा दाढेत असतानाही पत्नीने हिंमत न हरता त्याशी झुंज दिली. तिच्या धाडसामुळे आणि प्रसंगावधनाने पतीचा जीव थोडक्यात वाचला आहे. गोरख पावडे असे बिबट्याने हल्ला केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संजना पावडे असे या धाडसी पत्नीचे नाव आहे.
सोमवारी रात्रीच्या वेळी जनावरांच्या गोठ्यातून आवाज येत असल्याने गोरख पावडे हे गोठ्याकडे गेले. बिबट्या गोठ्यात आला होता. गोरख पावडे तिथे पोहोचताच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत अक्षरशः त्यांचे डोके जबड्यात घेतले. गोरख यांनी आरडाओरड केल्याने पत्नीने तिकडे धाव घेतली. संजना यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान दाखवत चक्क बिबट्याचे पाय आणि शेपटी जोरात ओढली आणि बिबट्याच्या पोटात बुक्क्यांचा मारा केला. तर त्यांच्या पाळीव कुत्र्याने मालकाला वाचवण्यासाठी बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला. गोरख पावडे यांचे वडील दशरथ यांनी दगडाने बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली.
पावडे कुटुंबियांनी दाखवलेल्या एकजुटीने गोरख पावडे यांचे प्राण वाचले. बिबट्याने जबड्यात डोकं पकडल्यामुळे गोरख पावडे यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान त्यांची पत्नी संजना पावडे यांनी दाखवलेल्या धाडसाचे पंचक्रोशीत कौतूक होत आहे.