शिवलिंग घेण्यासाठी जात असलेल्या जळगावातील भक्ताच्या वाहनास अवैध वाळु वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत, तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी.

Spread the love

जळगाव :- एका भीषण अपघातात तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. घरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर हा अपघात घडला आहे. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान या घटनेनं खोटेनगर परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले होते.महादेवाची पिंड आणण्यासाठी ओमकारेश्वरला जाण्यासाठी निघालेल्या जळगावरच्या भाविकांवर पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातला. जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघात तीन भाविक ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले आहे.

वाळूने भरलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.बांभोरी गावाजवळ केबीएक्स कंपनीच्या चौकात एका भरधाव ट्रकने भाविकांना घेऊन जाणाऱ्या क्रुझरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की क्रुझरचा जागीच चुराडा झाला. या भीषण अपघातात भूषण सुभाष खंबायत (वय 35), विजय हिम्मत चौधरी (वय 40), तुषार वासुदेव जाधव (वय 28) यांचा मृत्यू झाला. तर क्रुझरमधील अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.जळगाव शहरातील खोटेनगर परिसरातील साईनगर या भागातील उभारलेल्या मंदिरात महादेवाच्या पिंडींची स्थापना करायची होती. ती आणण्यासाठी सर्वजण ओंकारेश्वरला निघाले होते.

पहाटेच्या सुमारास सर्वजण भगवान शंकरचा जयजयकार करत मार्गस्थ झाले होते. मात्र घरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच बांभोरी गावाजवळ भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घरी पाचच मिनिटांनी अपघाताची बातमी आल्याने सर्वांनाच जबर धक्का बसला. अपघाताची माहिती मिळताच बांभोरी ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. क्रुझरचा चेंदा मेंदा झाल्याने क्रेन मागवून क्रूझर बाजूला करीत त्यात अडकून पडलेल्या जखमींना रुग्णालयात हलविले.

पोलिस अधिकारी दाखल

अपघातानंतर चोपडा भागाचे उप विभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, धरणगावचे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले, पाळधीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिरसाठ, विठ्ठल पाटील, जितेश नाईक, बाविस्कर, विजय चौधरी, गजानन महाजन आदींनी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पाळधी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घरातील कर्तेच गेल्याने कुटुंबीय उघड्यावर

मृत भूषण खंबायत याचे साईनगर येथे समृद्धी प्रोव्हिजन आहे. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. विजय चौधरी हे (शेरी ता. धरणगाव) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत माध्यमिक शिक्षक असून त्यांच्या मागे आई वडील, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. तर तुषार जाधव हा चालक असून मागच्या वर्षी त्याचे लग्न झाले होते. त्यांच्यावर घराची जबाबदारी होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान मृताच्या कुटुंबियांच्या आक्रोशाने रुग्णालयात शोककळा पसरली होती.

हे पण वाचा

टीम झुंजार