मुंबई – एसटी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी लवकरच एसटी महामंडळात मेगाभरती करण्यात येणार आहे. लवकरच 11 हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची एसटी महामंडळात भरती होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच आज अखेर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून दिलासा मिळणार असून उद्यापासून हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होणार आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाईला सुरूवात करणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यानंतर एसटीने हे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळात गाड्यांची संख्या देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 12 हजार लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर प्रति किलोमीटर प्रमाणे भाडेतत्त्वावर बसेस घेऊन चालवण्यात येणार आहेत. बेस्ट आणि पीएमपीएलच्या धर्तीवर एसटी महामंडळात निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
“एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची मुभा संपत आहे. जे कर्मचारी कामावर हजर झालेले असतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. तसेच 11 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. जे कामावर येत नाहीत म्हणजे त्यांना नोकरीची गरज नाही, त्यांच्यावर नियमानुसार केली जाणार आहे.”
– अनिल परब, परिवहनमंत्री