बरेली : पतीच्या अनैतिक संबंधांना पत्नी विरोध करत होती, म्हणून पतीने तिला संपवून टाकलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात बरेलीमध्ये घडली. आरोपी पती डॉक्टर आहे. त्याने इतक्या निर्घृणपणे पत्नीची हत्या केली, की तिच्या शरीरावर आणि डोक्यावर 12 जखमा आढळून आल्या.बिथरी चैनपूरमधल्या बालीपूर अहमदपूर इथे राहणाऱ्या सीमाचे वडील महेंद्रसिंह यांनी सहा एप्रिल रोजी इज्जतनगर पोलीस ठाण्यात तिचा पती अखिलेश आणि त्याचा भाऊ संजू यांच्याविरुद्ध हत्येचा एफआयआर दाखल केला. त्यांनी सांगितलं, की 2017 साली सीमाचं अखिलेशशी लग्न लावून दिलं होतं.
हुंड्यासाठी तो तिला त्रास द्यायचा. त्यातूनच त्याने 29 मार्चला रात्री उशिरा सीमाची मारहाण करून हत्या केली.घटनेची माहिती मिळताच इज्जतनगर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीच्या घरी छापा टाकून त्याला पकडण्यात आलं. स्वयंपाकघराच्या फरशीवर खूप रक्त सांडलेलं होतं. दरवाज्यापासून बेडरूमपर्यंत रक्ताचे थेंब उडाले होते. वॉशबेसिनमध्येही रक्ताचे डाग सापडले. त्यामुळे चित्र स्पष्ट झालं. आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.इन्स्पेक्टर जयशंकर सिंह यांनी सांगितलं, की चौकशीत आरोपी अखिलेशने कबूल केलं, की त्याने कंपाउंडर विजेंद्र याच्यासह मिळून हत्येचा कट रचला. त्यानुसार 29 मार्चला रात्री कंपाउंडर अखिलेशच्याच घरी राहिला.
रात्री सीमा घरात फिरत असताना तिला किचनमध्ये नेऊन फरशीवर पाडण्यात आलं. त्यानंतर चाकू आणि खलबत्त्याने डोक्यावर पाठीमागून वार करण्यात आला. त्यामुळे रक्तस्राव होऊ लागला. विजेंद्रने डंबेलच्या रॉडने तिच्यावर अनेक वार केले. त्यामुळे सीमाचा मृत्यू झाला.आरोपीने दिलेल्या माहितीवरून तो डंबेल रॉड, तसंच त्याने नाल्यात फेकून दिलेले कपडेही जप्त करण्यात आले.या घटनेदरम्यान अखिलेश आणि विजेंद्रच्या हातांना, तसंच कपड्यांना बरंच रक्त लागलं होतं. हात बेसिनमध्ये धुऊन सीमाचा मृतदेह कारमध्ये ठेवण्यात आला आणि तो घेऊन आरोपी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये गेले.
तिथे ती मृत असल्याचं घोषित झाल्यावर आरोपी कंपाउंडरसह चाचा हरिप्रसाद, चुलत भाऊ संजू आणि अन्य नातेवाईकांसह जिल्हा हॉस्पिटलमध्ये गेला. तिथेही ती मृत असल्याचं सांगण्यात आलं.त्यानंतर आरोपीने विजेंद्रला पुरावे नष्ट करण्यास घरी पाठवलं. त्याने रक्ताचे डाग बऱ्यापैकी पुसून काढले; मात्र शेजारचे आवाज ऐकून तो घाबरला आणि चाकू आणि खलबत्ता घेऊन पळून गेला.पोलिसांनी सांगितलं, की आरोपी अखिलेश स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे त्याने पत्नीवर मानसिक विकारासाठी उपचार सुरू असल्याची कागदपत्रं तयार करून ठेवली होती.
तिला नशेचं इंजेक्शनही देत असे. आरोपी अनेगक महिलांशी चॅटिंग करत असल्याचं आणि त्याचे त्यांच्याशी संबंध असल्याचं मोबाइलवरून स्पष्ट झालं. सीमा या गोष्टीला विरोध करत असे. म्हणूनच तिची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यानंतर अशी अफवा पसरवण्यात आली, की मानसिक विकारामुळे ती पडली आणि जखमी झाली होती. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आलं.या घटनेत अखिलेशच्या कुटुंबीयांचाही काही सहभाग आहे का, हेही तपासलं जाईल, असं इन्स्पेक्टर जयशंकर सिंह यांनी सांगितलं.