संपकरी एसटी कर्मचार्‍यांचा अतिरेक होतोय ; गुलाबराव पाटील

Spread the love

जळगाव : एसटी विलिनीकरणाच्या मागणीवरून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने आज ३१ मार्चपर्यंत संप मागे घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तरी देखील कर्मचारी आपल्या मागणीवरून संपावर ठाम असून यावर आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संपकरी एसटी कर्मचार्‍यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेचा विचार करता, आपल्या मागण्या कायम ठेवत एस टी कर्मचाऱ्यांनी त्वरित कामावर हजर होण्याचं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं. एस टी कर्मचारी संपाचा अतिरेक होत आहे. कारण शाळकरी मुले, शेतकरी यांच्याही अडचणी एस टी कर्मचाऱ्यांनी समजून घ्यायला पाहीजेत. एस कर्मचाऱ्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार आपल्याशी चर्चा करत असल्याचे पाटील म्हणाले. सर्व संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी कामावर यावं, असं आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांशी आठ वेळा चर्चा केली. नेमलेल्या समितीचा निर्णय आलाय. त्यामुळं आपल्या मागण्या कायम ठेवून तरी कामावर यावं, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांची त्यांचे नेते दिशाभूल करत आहेत, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलाय.

टीम झुंजार