२४ घटस्फोटित व भावनिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना फसवणाऱ्या भामट्यांस पोलिसांनी केले जेरबंद, अनेक राज्यात आहेत गुन्हे दाखल.

Spread the love

मुंबई – घटस्फोटित महिला टार्गेटवर..ज्या महिला एकट्या असतात, ज्यांच्या सोबतीला कुणीच नसतं अशा महिला भावनिकदृष्ट्या कमकुवत असतात, या महिला सहजपणे जाळ्यात अडकतात. अशाच महिलांना भामट्यांकडून शिकार बनवलं जातं.

एका मॅट्रोमोनियल साईटवर स्वत:ला उद्योगपती म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने अनेक महिलांना जाळ्यात अडकवलं. त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यानंतर फसवणूक केली. ही घटनेमागील सत्य उघड होताच पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली.

ही घटना हैदराबाद येथील इमरान अली खान या व्यक्तीची आहे. ज्याने विविध राज्यात राहणाऱ्या २४ हून अधिक महिलांना त्याच्या जाळ्यात ओढलं. इमरानला आता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात ४२ वर्षीय महिला शिक्षिकेने तक्रार नोंदवली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ४० वर्षीय इमराननं मेट्रोमोनियल साईटवर त्याचा प्रोफाईल बनवला होता. मे २०२३ मध्ये ही शिक्षिका इमरानच्या संपर्कात आली. इमरान हा स्वत:ला बांधकाम क्षेत्रातील उद्योजक असल्याचा दावा करत होता.

इमरान अली खाननं त्याच्याकडे एमसीएची डिग्री असल्याचं शिक्षिकेला सांगितले. तसेच त्याचे २ भाऊ कॅनडात शिक्षण घेत आहेत असं सांगत इमरानने महिलेला आकर्षिक केले. त्यानंतर पीडित महिला आणि इमरान यांच्यात जवळीक वाढली. दोघेही रात्री उशिरापर्यंत बोलत बसायचे. मी तुझ्याशी लग्न करणार असं इमराननं महिलेला सांगितले. महिलेला इमरानवर विश्वास होता. हा विश्वास जसजसा वाढत गेला तसं इमराननं महिलेची फसवणूक करण्यास सुरुवात केली.

फसवणुकीच्या बहाण्यानं इमराननं महिलेकडून पैसे मागितले. इमरानला मुंबईतल्या भायखळा परिसरात फ्लॅट खरेदी करायचा असून लग्नानंतर आपण दोघे तिथे राहू असं त्याने महिलेला सांगितले.

हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी २१.७३ लाख कमी होते. त्यासाठी महिलेकडून त्याने हे पैसे घेतले. मात्र हळूहळू इमरान आपली फसवणूक करतोय असं महिलेच्या लक्षात आले. त्याने घेतलेले पैसे पुन्हा देण्यासही नकार दिला. त्यानंतर पीडित महिलेने ही घटना कुटुंबाला सांगितली. तेव्हा कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.दरम्यान, इमरानला पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले. हैदराबाद येथून त्याला अटक केली. इमरान अली खानवर मुंबई, धुळे, सोलापूर, परभणी, देहारादून, कोलकाता, लखनौ, दिल्ली यासारख्या शहरात २४ हून अधिक गुन्हे नोंद आहेत. महिलांची फसवणूक करणे त्यांची आर्थिक लूट करणे असे गुन्हे त्याच्यावर आहेत. त्याचसोबत तेलंगणा येथे इमरानवर हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, मारहाण या प्रकारचे अनेक गुन्हे नोंद असल्याचं समोर आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार