झुंजार । प्रतिनिधी एरंडोल
एरंडोल- पेट्रोल,डीझेल,घरगुती gas सिलेंडर यासारख्या इंधन दरवाढीविरोधात संतप्त झालेल्या कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोरील हिमालय पेट्रोल पंपावर निदर्शने करून दरवाढीचा निषेध केला.केंद्र सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी इंधन दरवाढीमुळे जिवनावश्यक वस्तूंच्या दारात वाढ होऊन सर्वसामान्य नागरिक हतबल झाले असल्याचे सांगितले.पाच राज्यातील निवडणुका संपताच केंद्र सरकारने इंधनाच्या दरात दररोज वाढ करून महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला.डॉ.फरहाज बोहरी यांनी कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक अद्याप सावरलेले नाहीत,मात्र केंद्र सरकार सातत्याने इंधनाच्या दरात वाढ करून वाढत्या महागाईला प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले असून वाढत्या महागाईमुळे चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश्न नागरिकांसमोर उभा असल्याचे सांगितले.यावेळी प्रा.आर.एस.पाटील यांनी केंद्रसरकारच्या कामकाजावर टीका केली.
यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिका-यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.कॉंग्रेस पदाधिका-यांनी मोटर सायकलींना हार घालून त्या लोटन नेल्या तर रिकाम्या gas सिलेंडरला देखील हार घालून दरवा
ढीचा वेगळ्या पद्धतीने निषेध केला.आंदोलनात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय भदाणे,सेवादलाचे तालुकाध्यक्ष संजय कलाल,अल्पसंख्यांक आघाडीचे रईस शेख,कलीम पठान,डॉ.शेख,इसक शेख,मदनलाल भावसार,मुजलीम शेख यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.