जामनेर :- तालुक्यातील पळसखेडा बुद्रूक येथील वसंत लीला नगर येथे राहणाऱ्या बाजीराव पवार (वय ५८) या खासगी वाहनचालकाची त्याच्याच मद्यपी अविवाहित तरुण मुलाने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून धारदार चाकूने मानेवर वार करून निर्घृण हत्या केली. तालुक्यातील आठ दिवसातील ही सलग दुसरी घटना असून, संशयित सुमीत पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाजीराव पवार (वय ५८) हे आपल्या ट्रकमध्ये सुप्रिम कंपनीतून पाइप भरून बंगळूर येथे जाण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वी ते जेवणासाठी पळसखेडा बुद्रूक येथे घरी आले.
जेवण करून सायंकाळी सातला पाइपने भरलेला ट्रक घेऊन बंगळूर येथे जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी गाडीची ऑइलिंग व इतर तयारी सुरू केली. याच दरम्यान सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान त्यांचा अविवाहित तरुण व्यसनाधीन मुलगा सुमीत हा दारूच्या नशेत घरी आला. बाप बंगळूर येथे गेल्यावर आठ – दहा दिवस येणार नाही. रोजच्या कटकटीला कंटाळून सुमितची आई व बहीण गुरुवारी (ता.१६) दुपारीच घरून निघून गेले होते. दारू पिण्यासाठी पैशांची चणचण भासेल म्हणून सुमीत हा बापाला पैसे मागू लागला.
वडील बाजीराव पवार यांनी पैसे देण्यास नकार दिला असता सुमितने खिशातून चाकू काढून धारदार शस्त्राने वडिलांच्या मानेवर वार केले. वडील बाजीराव गंभीर जखमी अवस्थेत शंभर, दीडशे पावले चालत झाडाखाली बसले. तेथेच त्यांना चक्कर येऊन ते कोसळले. आजूबाजूचे लोक धावले व बाजीराव यांना रिक्षातून उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आणत असतानाच बाजीराव यांचे निधन झाले. बाजीराव पवार हे खासगी वाहनचालक असून, त्यांना पत्नी, एक मुलगी व दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे लग्न झाले असून, तो नाशिक येथे स्थायिक झाला असून, दुसरा मुलगा सुमीत हा दिवसभर दारूच्या नशेत व्यसनाधिन असल्याने बाजीराव पवार यांचे पत्नी व सर्व कुटुंब त्यास त्रस्त झाले होते.
आठवड्यातील दुसरी घटना
सुमितचा त्रास हा दररोजचा असल्याने शेजारी पाजारीही त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. सुमितच्या त्रासाला कंटाळून त्याची आई व बहीणही बाहेरगावी निघून गेले होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जामनेर तालुक्यातील ही दुसरी घटना असून, १२ मेस मुलानेच पैशासाठी आईचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४