गाझियाबाद :- उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे धक्कादायक प्रकार घडलाय. येथे एका व्यक्तीनं स्वतःच्या पत्नीचा खून करून तिच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला, व त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. घरगुती वादातूनच पतीनं ओढणीनं गळा आवळून त्याच्या पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने पत्नीच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला, व तो सेल्फी स्वतःच्या नातेवाईकांना पाठवला. त्यानंतर स्वतः फाशी घेत आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
एटा येथील मूळ रहिवासी असलेलं एक जोडपं कामानिमित्त गाझियाबाद येथे राहत होतं. त्यामधील पती हा गाझियाबादजवळील लोणी भागात एका ठिकाणी काम करीत होता. तर त्याची पत्नी नोएडा येथे खासगी कंपनीत काम करत होती. पत्नी कामावर जात असल्यामुळे पती-पत्नीमध्ये कायम वाद होत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. याबाबत पोलीस उपायुक्त (ग्रामीण) विवेक कुमार यादव यांनी सांगितलं की,
‘मृत पतीनं सर्वात प्रथम पत्नीचा ओढणीनं गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने त्याच ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पतीनं त्याच्या मृत पत्नीसोबत सेल्फी काढला, व तो त्याच्या पाच ते सहा नातेवाईकांना पाठवला होता. घटनास्थळी पोलीस गेले, तेव्हा त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद होता का, याचीही खात्री केली आहे. त्यामुळे घरगुती वादातूनच ही घटना घडल्याचा आमचा संशय आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.’