पिंपळनेर येथे ३९ वर्षीय मजुरीकाम करणाऱ्या विवाहितेवर केला सामूहिक बलात्कार, संशयितांना एक तासात अटक.

Spread the love

पिंपळनेर : येथील बैल मार्केटमध्ये उंभर्टी (पो. नवापूर, ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथील मजुरीकाम करणाऱ्या ३९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर फरारी झालेल्या पिंपळनेर (घोड्यामाल) येथील संशयित आरोपींना एक तासात बेड्या ठोकल्या.निलेश सतीश निकम (वय ३२) व स्वप्निल शिवाजी वाघ (वय २६) अशी संशयितांची नावे आहेत. उंभर्टी येथील पीडितेने पिंपळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व मुलगा नेहमीप्रमाणे सटाणा येथील कांदा व्यापाऱ्याकडे मजुरीसाठी गेलो होतो.

रविवारी (ता.२६) सटाणा येथील काम आटोपून सायंकाळी सहाच्या सुमारास ॲपेरिक्षाने घरी जाण्यासाठी निघालो होतो. रात्री आठच्या सुमाराम पिंपळनेर बसस्थानकात उतरलो. परंतु, पिंपळनेर तेथून गावी जाण्यासाठी बस नसल्याने मी व मुलाने स्थानकात काहीवेळ प्रतीक्षा करुनही बस न मिळाल्यामुळे सामोडे चौफुली येथे खासगी वाहनाची प्रतीक्षा करीत असताना रात्री अकराच्या पिंपळनेर बसस्थानकाच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहनातून आलेल्या दोघांनी मला जबरदस्तीने बैल बाजारातील मैदानावर नेत अत्याचार केला.

पीडितेने याबाबत मुलाचा घडला प्रकार सांगितला. एका एटीएमवरील वॉचमनने देखील पिकअप वाहनाची ओळख सांगितली. त्यानंतर पीडितेने पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांनी पिकअप वाहनाच्या क्रमांकावरून संशयितांचा शोध सुरु केला.एमएच-१८-बीजी-४६२६ या क्रमांकाचे पिकअप वाहन शोधण्यात पोलिसांना यश आले. संशयित पिंपळनेरच्या घोड्यामाल येथीर रहिवाशी आहेत. संशयित निलेश सतीश निकम (वय ३२) व स्वप्निल शिवाजी वाघ (वय २६) यांना बेड्या ठोकल्या.

दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.विभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, पोलिस उपनिरीक्षक भूषण शेवाळे, पोलिस हवालदार कांतीलाल अहिरे, श्याम अहिरे, पोलिस कॉन्स्टेबल नरेंद्र परदेशी यांनी संशयितांचा शोध घेतला.

हे पण वाचा

टीम झुंजार