वडिलांच्या प्रेमसंबंधांला विरोध,प्रियकरावर विनयभंगाच्या गुन्हा दाखल,१५ वर्षीय मुलीने प्रियकराच्या मदतीने केली वडील अन् भावाची हत्या; फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह

Spread the love

भोपाळ : मध्य प्रदेशमधील जबलपूर शहरात एका अधिकाऱ्याची आणि त्याच्या आठ वर्षीय मुलाची मार्च महिन्यात हत्या झाली होती. या अधिकाऱ्याचा खून त्याच्याच अल्पवयीन मुलीने आपल्या बॉयफ्रेंडबरोबर मिळून केला.फक्त वडिलांचाच नाही तर स्वतःच्या आठ वर्षीय भावाचा खून करण्यातही या मुलीने बॉयफ्रेंडची मदत केली. गर्लफ्रेंडने विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या बॉयफ्रेंडने चित्रपट आणि वेब सीरिज पाहून गर्लफ्रेंडच्या वडिलांच्या खुनाचा प्लॅन रचल्याचं म्हटलं जात आहे. त्याने इन्स्टाग्रामवर किलरचा डीपी लावला होता. मागच्या 75 दिवसांपासून जबलपूर पोलीस या धक्कादायक प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.खून करून पुरावे नष्ट करून आरोपी मृताच्या मुलीला घेऊन पळून गेला. त्याने 75 दिवसांत आठ राज्यांत प्रवास केला आहे. पोलीस त्याच्या प्रत्येक लोकेशननुसार तपास करत आहेत, पण तो दरवेळी हातातून निसटतोय. आरोपी गर्लफ्रेंडबरोबर पुण्यातही आला होता आणि त्याने तिथल्या एटीएममधून पैसेही काढले होते. इतके दिवस तपास केल्यावर पोलिसांना त्या अल्पवयीन मुलीला अटक करण्यात यश आलं आहे.

घटना नेमकी काय?

मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये 14-15 मार्चच्या रात्री सिव्हिल लाइन्स स्टेशन परिसरातील रेल्वे मिलेनियम कॉलनीत राहणारे राजकुमार विश्वकर्मा व त्यांचा आठ वर्षांचा मुलगा तनिष्कचा निर्घृण खून झाला. राजकुमार रेल्वेत सुप्रिटेंडंट पदावर होते. हा खून त्यांची अल्पवयीन मुलगी व तिचा बॉयफ्रेंड मुकुल सिंह यांनी केला. पोस्टमॉर्टेम करणारे डॉ. हर्ष लोधी यांच्यामते राजकुमार यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने 10 वेळा, तर तनिष्कच्या डोक्यावर चार वेळा हल्ला केला होता.

मृतांच्या घराजवळच राहतो आरोपी

आरोपी मुकुल सिंह गर्लफ्रेंडच्या घराजवळच राहतो. तपासात सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, घटनेच्या रात्री मुकुल गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला यश येत नाही मग तो माघारी जातो. काही वेळाने तो गॅस कटर, पॉलिथीन व इतर सामान घेऊन परत येतो. यावेळी तो मागच्या दाराजवळ जातो, दार कापून तो आत शिरतो. मदतीसाठी गर्लफ्रेंड घरातच असते. दोघेही मिळून राजकुमार व तनिष्कची हत्या करतात.

बाप-लेकाचे मृतदेह लपवले

दोघांची हत्या केल्यावर मुकुल गर्लफ्रेंडच्या मदतीने मृतदेह पॉलिथीनमध्ये गुंडाळतो. मग राजकुमार यांचा मृतदेह किचनमध्ये तर तनिष्कचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवतात. मग दोघेही मिळून हत्येचे पुरावे नष्ट करतात. घरात फिंगरप्रिंट सापडू नये, यासाठी आरोपींनी हातमोजे वापरले.

हत्येनंतर 10 तास तिथेच थांबले

हत्या करून मृतदेह लपवल्यावर दोघं जवळपास 10 तास एकाच रुममध्ये राहिले, दोघांनी सकाळी चहा बनवून प्यायला. सकाळी दूधवाला आल्यावर त्या मुलीने दूध घेतलं. खुनाची घटना कुणालाच कळणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. मग संधी साधून ते दोघेही घरातून पळून गेले.

पोलिसांना कशी मिळाली माहिती?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या मिलेनियम कॉलनीत राहणारे राजकुमार व त्यांचा मुलगा तनिष्क यांची 15 मार्च रोजी शेजारी राहणाऱ्या मुकुलने हत्या केली होती. राजकुमार यांच्या मुलीने इटारसी इथं राहणाऱ्या राजकुमार यांच्या मोठ्या भावाच्या मुलीला व्हॉइस मेसेज पाठवून खूनाची माहिती दिली होती. मुकुलने भाऊ आणि वडिलांचा खून केल्याचं तिने म्हटलं होतं. मुलीचा मेसेज आल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी जप्त केले मृतदेह

पोलीस घरी पोहोचले तर दार बाहेरून बंद होतं. घरात गेल्यावर त्यांना दोन्ही मृतदेह सापडले. 52 वर्षीय राजकुमार हे रेल्वेत सुप्रिटेंडंट पदावर होते आणि वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नीचं माता वैष्णो देवीच्या यात्रेदरम्यान निधन झालं. ते त्यांची अल्पवयीन मुलगी व आठ वर्षांच्या मुलाबरोबर राहायचे.सप्टेंबर महिन्यात राजकुमार यांच्या मुलीने आरोपी मुकुलने विनयभंग केल्याचा आरोप केला होता, मग त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकलं पण तो जामीनावर बाहेर आला. आरोपीने बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं म्हटलं जातं. दुसरीकडे राजकुमार यांची मुलगी व मुकुल यांचं प्रेम होतं आणि त्यांना लग्न करायचं होतं. मात्र राजकुमार विरोध करत होते. वडिलांच्या दबावाखाली मुलीने पोलिसांत विनयभंगाची तक्रार दिल्याचं म्हटलं जातंय.

आरोपीने तुरुंगातून आल्यावर पाहिली वेब सीरिज

आरोपीने फिल्मी स्टाईलमध्ये हे हत्याकांड केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगातून सुटल्यानंतर आरोपी मुकुल वेब सीरिज आणि हॉलिवूड चित्रपट पाहत असे. त्याने सोशल मीडिया साईटवरून हल्ला करण्यासाठी साहित्य मागवले होते. यासोबतच बाजारातून छोटे गॅस कटर, पॉलिथीन, ग्लव्ह्ज हे साहित्य विकत घेतलं होतं. वेब सीरिज पाहून आरोपीने हे खून केले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.

हत्या केल्यावर दोघेही पोहोचले महाराष्ट्रात

घटनेनंतर दोघेही बसमध्ये चढले आणि सिहोरामार्गे कटनीला पोहोचले. तिथे काही तास घालवल्यानंतर ते ट्रेनने महाराष्ट्रातील पुण्याला रवाना झाले, त्यानंतर पोलिसांचे पथक आरोपींच्या प्रत्येक ठिकाणाचा माग काढत होतं. आरोपींनी सोबत घेतलेले पैसे संपले, मग त्यांनी पुण्यातील एटीएम मशीनमधून पैशांचा व्यवहारही केला.

घटनेनंतर आठ राज्यात केला प्रवास

खून केल्यानंतर दोघांनी आतापर्यंत बंगळुरू, अयोध्या, मथुरा, वृंदावन, गोरखपूरसह आठ राज्यांचा प्रवास केला आहे. पोलिसांनी आरोपीला वाँटेड घोषित केलं आहे. त्याची माहिती देणाऱ्याला 10,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी नेपाळपर्यंत शोधमोहिम राबवली आहे.

75 दिवसांनी अल्पवयीन मुलीला पोलिसांनी केली अटक

घटनेच्या 75 दिवसांनंतर पोलिसांना मोठे यश मिळाले. उत्तराखंडमधील हरिद्वार पोलिसांनी हत्येमध्ये सहभागी असलेल्या मृताच्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे. तिला एका मंदिराबाहेरून अटक करण्यात आली. जबलपूर पोलिसांचे एक पथक अल्पवयीन मुलीला घेण्यासाठी उत्तराखंडमधील हरिद्वारला रवाना झाले आहे. पोलीस आरोपी तरुणीला जबलपूरला आणून तिची चौकशी करणार आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार