हॉटेल व्यावसायिकाकडून मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आहोत अशी बतावणी करून भरदिवसा 25 लाख लुटले ; पण एका चुकीमुळे प्लॅन फसला.

Spread the love

मुंबई :- भर दिवसा बड्या हॉटेल व्यावसायिकाला 25 लाखांना लुटण्यात आले आहे. मात्र, एका चुकीमुळे सगळा प्लॅन फसला. पोलिसांनी या खंडणाखोर टोळीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या खंडणाखोरांच्या टोळीत पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगत माटुंगा येथील महेश्वरी उद्याननजीक असलेल्या कॅफे म्हैसूर या हॉटेल व्यावसायिकाला सायन येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन सहा जणांनी 25 लाखांना गंडा घातला आहे. नरेश नायक असे या फसवणुकीला बळी पडलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या ,हा आरोपींनी व्यावसायिकाच्या घरी जाऊन निवडणूकीसाठीचा काळापैसा घरी ठेवल्याचा आरोप केला

आणि मांडवली करण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. या प्रकरणी व्यावसयिकाने दिलेल्या तक्रारीनुसार सायन पोलिस ठाण्यात 6 अनोळखी व्यक्तींवर भारतीय दंड संविधान कलम १७०, ४२०, ४५२, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर काल पोलीस कर्मचारी बाबासाहेब भागवत (वय 50) आणि निवृत्त पोलीस कर्मचारी दिनकर साळवे (वय 60) या दोघांना अटक करण्यात आली असून आज इतर चौघांना अटक केली असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के यांनी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

व्यावसायिकाला विश्वास पटावा म्हणून सहाही आरोपींनी स्वत:ची ओळखपत्र बनवली होती. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास हे आरोपी हाॅटेल व्यावसयिक नरेश नायक यांच्या सायन हाॅस्पिटल जंक्शन येथील घरी पोहचले. अवघ्या काही मिनिटात आरोपींनी व्यावसायिकाला धाकात ठेवत, त्याच्या घरातील 25 लाखाची रोकड घेऊन पसार झाले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी आरोपींनी दिली. व्यवसायिकाने या घटनेनंतर त्याच्या परिचयाच्या पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दरोडेखोरांनी पोलीस असल्याचे सांगून लोकसभा निवडणुकीसाठी असलेला पैसा घरात दडवून ठेवल्याचे सांगून म्हैसूर कॅफे मालकाच्या घरातील 25 लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला.

या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सेवानिवृत्त पोलीस दिनकर साळवे आणि नागपाडा मोटार वाहन विभागातील पोलीस कर्मचारी बाबासाहेब भागवत यांचा समावेश आहे. बाबासाहेब भागवत हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे वाहन चालक म्हणून काम करतो. तर तिसरा आरोपी सागर रेडेकर (वय ४२) हा खाजगी चालक आहे. चौथा आरोपी वसंत नाईक (वय ५२) हा कॅफे म्हैसूर या हॉटेलचा माजी व्यवस्थापक आहे. आरोपी श्याम गायकवाड (वय ५२) हा इस्टेट एजंट असून आरोपी नीरज खंडागळे (वय ३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार नरेश नायक हे आपल्या आईसोबत सायन जंक्शन येथे राहतात. नरेश नायक हे सायन रुग्णालयासमोर असलेल्या एका इमारतीत राहतात. सोमवारी दुपारी ६ इसम त्यांच्या घरी आले आणि त्यांनी आम्ही मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आहोत अशी बतावणी केली. त्यातील दोघांनी मुंबई पोलिसांचे ओळखपत्रही दाखवले. आम्ही निवडणूक ड्युटीवर असून तुमच्या घरात निवडणुकीसाठी लागणारी मोठी रक्कम 17 कोटी असल्याची माहिती आम्हाला मिळाली असे सांगून 6 जणांपैकी चौघांनी घराची झडती घेऊन कपाटातील 25 लाख रुपयांची रोकड बाहेर काढली. नरेश नायक यांनी ही रोकड हॉटेल व्यवसायातील असल्याचे सांगितले.

तरीही त्यांनी नरेश नायक यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन प्रकरण मिटविण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी नायक यांच्याकडे केली आणि त्यांना धमकीही दिली. नायक यांनी एवढी रक्कम माझ्याकडे नाही असे सांगताच टोळक्याने 25 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला होता.पोलिसांनी आणि फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तक्रारदार हॉटेल व्यावसायिक नरेश नायक यांच्या घराची सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यावेळी या गुन्ह्यात काही पोलिसांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे समोर आले. रात्री उशिरा सायन पोलिसांनी सेवानिवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलीस कर्मचारी या दोघांना अटक केली असून हा गुन्हा करणाऱ्या 6 जणांनी पोलिसांच्या वाहनाचा वापर केला अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार