पहिल्याच पावसात नविन वसाहतींमधील रस्त्यांची दयनीय अवस्था, गटार व नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे सर्वत्र चिखल.

Spread the love

एरंडोल :- काल मध्यरात्री झालेल्या पहिल्याच पावसात शहरातील सर्व नवीन वसाहतींमधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.नवीन वसाहतींमध्ये सुरु असलेले गटारींचे कामे तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे सर्व रस्त्यांवर सर्वत्र चिखल झाल्यामुळे रहिवाशांना पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे.याबाबत पालिका प्रशासनाने त्वरित दखल घेवून रस्त्यांवर खडीचा कच टाकावा अशी मागणी महिलांनी केली आहे. शहरात काल मध्यरात्रीपासून आज सकाळपर्यंत जोरदार पाउस झाल्यामुळे नवीन वसाहतींमधील रस्त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे.

सद्यस्थितीत नवीन वसाहतींमध्ये सुमारे एक वर्षापासून नवीन गटारी आणि नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे.नवीन वसाहतींमध्ये लाखो रुपये खर्च करून रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले होते.मात्र नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी वसाहतींमधील पक्के सिमेंट रस्ते फोडण्यात आले आहेत.पक्के रस्ते फोडून त्याखाली असलेली काळी माती रस्त्यांवर टाकण्यात आल्यामुळे सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे. काळ्या मातीमुळे निर्माण झालेल्या चिखलामुळे अनेक जण पाय घसरून पडल्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.गटारीच्या कामांमुळे सांडपाणी वाहून जाण्यात अडचण निर्माण होत असल्यामुळे सर्वत्र डासांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलात तीन ते चार स्कूलबस ठिकठीकाणी फसल्यामुळे आज विद्यार्थ्यांना शाळेत जात आले नाही.रस्त्यावरील चिखलामुळे महिला, अल्पवयीन मुले,वयोवृद्ध नागरिक यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.तसेच चिखलामुळे दुचाकी घसरत असल्यामुळे दुचाकी चालवतांना चालकास तारेवरची कसरत करावी लागत आहे.गटारीचे व नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.पहिल्याच पावसात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून अद्याप पूर्ण पावसाळा बाकी आहे.नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून घरांचे बांधकाम केले आहे,पालिकेच्या करांचा भरणा वेळेवर करण्यात येतो मात्र पालिकेकडून नवीन वसाहतींमध्ये पुरेशा प्रमाणावर सोयी व सुविधा
उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी गटारी व नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याची गरज होती.मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा अभियंता यांनी नवीन वसाहतींमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांची सहा महिन्यांपूर्वी बदली झाली असून त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर अद्यापपर्यंत नियुक्ती करण्यात आलेली नाही.धरणगावचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचेकडे पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून पदभार आहे.पालिकेवर तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिका-यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.याबाबत पालिका प्रशासनाने त्वरित दखल घेवून नवीन वसाहतींमधील रस्त्यांवरील चिखल उचलून त्याठिकाणी खडीचा कच टाकून रहिवाशांना दिलासा द्यावा तसेच गटारी व पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार