माता तू वैरीण! प्रियकरासोबत प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईने पोटच्या दोन्ही मुलांना संपविले अन् शेततळ्यात बुडून मेल्याचा केला बनाव.

Spread the love

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये दोन महिन्यांपूर्वी शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली असून मुलांच्या हत्येप्रकरणी त्यांची आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या दोन्ही मुलांच्या जीवावर उठल्याचे समोर आले आहे. आरोपी महिलेने प्रियकराच्या मदतीने दोन्ही मुलांची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 एप्रिल 2024 रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील शेततळ्यात बुडून दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रितेश सारंगधर पावसे (12 वर्ष) आणि प्रणव सारंगधर पावसे (8 वर्ष) अशी मृत भावंडांची नावे होती. वर्षभरापूर्वी मुलांच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत होती आणि मुलांचा देखील शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली होती.

मात्र ग्रामस्थांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनेकदा व्यक्त केला होता. मात्र पुरावे नसल्याने पोलीस काहीच करू शकत नव्हते.दोन महिन्यानंतर एका साक्षीदाराने दिलेल्या जबाबावरून हा अपघात नव्हे तर हत्या असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मुलांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची जन्मदाती आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे यांनी केला असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे आणि मयत मुलांची आई कविता या दोघांना अटक केली असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये एका महिन्यात कुटुंब संपलं

दरम्यान, नाशिकमध्ये एका महिन्यात कुटूंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. नाशिकच्या पाथर्डीफाटा येथील वासननगर इथं वास्तव्यास असलेल्या महाजन कुटुंबातील 9 वर्षीय मुलीचा आजारपणामुले मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूने मोठा धक्का घेतलेल्या तिच्या आईने तेराव्याला विधी सुरू असताना जीव सोडला. या दोघींच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच पंधरा दिवसात राहत्या घरी वडील आणि मुलांचा मृतदेह आढळून आला. अवघ्या महिन्याभरात नाशिकात वास्तव्यास असणाऱ्या महाजन कुटूंबावर काळाने घाला घातल्यामुळे नाशिक शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टीम झुंजार