अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी राज्यात 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली. यासह राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 13 वरून 26 झाली आहे. जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील 13 नवीन जिल्ह्यांचा शुभारंभ केला.
पुजाऱ्यांनी ठरवून दिलेल्या “शुभ मुहूर्तावर” सीएम रेड्डी यांनी जिल्ह्यांचे उद्घाटन केले. आजपासून सर्व नवीन जिल्हे अस्तित्वात येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, अधिक जिल्ह्यांची निर्मिती हे सर्व क्षेत्राच्या विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सीएम रेड्डी यांनी आश्वासन दिले होते की जर त्यांचा पक्ष सत्तेवर आला तर 25 लोकसभा मतदारसंघांपैकी प्रत्येकाला एक जिल्हा करण्यात येईल. आज त्यांनी तेच आश्वासन पूर्ण करत राज्याला 13 नवे जिल्हे दिले आहेत.
त्याचवेळी, रविवारी संध्याकाळी जारी केलेल्या नवीन जिल्ह्यांसाठी औपचारिक अधिसूचनेसह, राज्य सरकारने सर्व आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे फेरबदल केले आहेत. नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची नियुक्ती केली आहे.