स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून केली जागेची खरेदी,सोनबर्डी,हणमंतखेडे बुद्रुक ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम.

Spread the love

एरंडोल :- गावात स्मशानभूमी नसल्यामुळे
मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतांना येणा-या अडचणी लक्षात घेवून सोनबर्डी आणि हणमंतखेडे बुद्रुक (ता.एरंडोल) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा
करून स्मशानभूमीसाठी सुमारे ५ लाख ७५ हजार रुपयांची वीस गुंठे जागा खरेदी करून ग्रामीण भागातील नागरिकांसमोर आदर्श उभा केला आहे.स्मशानभूसाठी जागा खरेदी करण्यासाठी पराग इरिगेशनचे संचालक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीविधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार यांचेसह युवकांनी प्रयत्न केले.

तालुक्यातील सोनबर्डी व हनमंतखेडा बुद्रुक या गावात स्मशानभूमी नसल्यामुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारप्रसंगी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरु असतांना
अचानक पाउस आल्यास ग्रामस्थांची तारांबळ उडत असते.गावालगत असलेल्या नदीच्या काठावर मोकळ्या जागेत मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करावे लागत असल्यामुळे गावात स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करीत होते.मात्र शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.

युवा उद्योजक तथा पराग इरिगेशनचे संचालक पराग पवार यांनी पुढाकार घेवून दोन्ही गावात स्मशानभूमीसाठी जागा खरेदी करून बांधकाम करण्याची संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडली.त्यास ग्रामस्थांसह युवकांनी पाठींबा देवून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.उद्योजक पराग पवार यांनी सोनबर्डी आणि हणमंतखेडे बुद्रुक या दोन्ही गावातील स्मशानभूमीसाठी जागा खरेदीसाठी प्रत्येकी ५१ हजार रुपये असे १ लाख २ हजार रुपये रोख दिले.तर सुर्यकांत पाटील यांनी सोनबर्डी येथील स्मशानभूमीची जागा खरेदी करण्यासाठी ६१ हजार रुपये रोख दिले.विठ्ठल केशव पाटील,विजय विश्वास पाटील,प्रकाश उत्तम पाटील,श्रावण पितांबर पाटील,राजेंद्र भागाव पाटील
यांचेसह युवकांनी गावात घरोघरी जाऊन वर्गणी जमा केली.

ग्रामस्थांनी देखील जागा खरेदीसाठी सहकार्य करून सुमारे सहा लाख रुपये जमा करून आदर्श उभा
केला.जागा खरेदीसाठी लागणारी रक्कम जमा झाल्यानंतर ग्रामस्थांनी गावालगत असलेल्या नदीजवळील जागा निच्छित करून जागामालक कपूरचंद गंभीर पाटील आणि दीपक गंभीर पाटील यांचेशी संपर्क साधून स्मशानभूमीसाठी जाग देण्याचे
सांगितले.कपूरचंद पाटील यांची दहा गुंठे जागा हणमंतखेडा बुद्रुक गावाच्या स्मशानभूमीसाठी तर दीपक गंभीर पाटील यांच्या मालकीची दहा गुंठे जागा
सोनबर्डी गावाच्या स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीच्या नावावर खरेदी करण्यात आली.

सोनबर्डी व हनमंतखेडा बुद्रुक येथे ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी लागणा-या जागेच्या खरेदीसाठी लोकवर्गणी जमा करून ग्रामपंचायतीच्या नावावर जागेची नोंदणी करून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.स्मशानभूमीसाठी जागेची खरेदी केली असून शासनाच्या माध्यमातून स्मशानभूमीचे बांधकाम पूर्ण करणार असल्याचे उद्योजक पराग पवार यांनी सांगितले.गावासाठी स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येणार असल्यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.यापूर्वी देखील पराग पवार यांनी गावात झालेल्या आडगाव येथील माहुजी महाराज कीर्तन सप्ताहातील कीर्तनकार महाराजांचा खर्च स्वत: केला होता.

गावासाठी स्मशानभूमी असावी अशी संकल्पना दोन वर्षांपासून मनात होती.ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर संकल्पना पूर्ण होत असल्यामुळे मानसिक समाधान मिळत असून लवकरच स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येईल.स्मशानभूमीच्या बांधकामामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

पराग पवार,संचालक पराग इरिगेशन एरंडोल.

टीम झुंजार